Rahul Gandhi vs PM Modi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेवर जोरदार हल्ला चढवला. सोमवारी त्यांनी धारावी प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. वास्तविक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वांसमोर तिजोरी ठेवली. त्यावर लिहिले होते, 'एक हैं तो सेफ हैं'. त्यांनी तिजोरीतून दोन पोस्टर बाहेर काढले. त्या पोस्टवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले.
तिजोरीतील दोन पोस्टर्स कसली होती?
तिजोरीतील एका पोस्टरवर धारावीचा नकाशा होता आणि त्यावर शिंदे सरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली होती. तर दुसऱ्या पोस्टवर एका बाजूला उद्योगपती गौतम अदानी दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांचा एकमेकांना नमस्कार करतानाचा फोटो होता. हा फोटो दाखवून राहुल गांधी म्हणाले की, हाच आहे पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' घोषणेचा अर्थ. 'एक हैं तो सेफ हैं' हे घोषवाक्य मी तुम्हाला समजावून सांगितले आहे. एक कोण आहेत?- नरेंद्र मोदी जी, अदानी, अमित शाह हे ते लोक आहेत. सेफ कोण आहेत? अदानीजी सुरक्षित आहेत. आता त्रास होत असेल तर तो धारावीतील जनतेलाच असेल. त्यात काही नुकसान झाले तर तो धारावीतील जनतेचे असेल. धारावीमध्ये भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांचे मोठे जाळे आहे, पण एका व्यक्तीच्या फायद्यासाठी नष्ट होत आहेत. हे नुकसान थांबवायला हवे, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपाच्या घोषणेची खिल्ली उडवली.
"महाराष्ट्राची निवडणूक ही विचारधारांची निवडणूक आहे. ही एक किंवा दोन अब्जाधीश आणि गरीब यांच्यातील निवडणूक आहे. अब्जाधीशांना मुंबईची जमीन त्यांच्या हातात जायला हवी आहे. अब्जाधीशांना एक लाख कोटी रुपये देण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, बेरोजगार, तरुणांना मदतीची गरज आहे, असा आमचा विचार आहे. आम्ही प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा करू, महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोफत बस प्रवास असेल, ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, आम्ही सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ७ हजार रुपये जाहीर केले आहेत. आम्ही तेलंगणा, कर्नाटकात जी जात जनगणना करत आहोत, ती महाराष्ट्रातही करणार आहोत", असेही मत त्यांनी मांडले.