JP Nadda : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व 288 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नवी मुंबईत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. नड्डा म्हणाले, 'एनडीएने राजकारणाची नवी संस्कृती निर्माण केली आहे. '
आम्ही जे बोललो, ते केले...'आम्ही जनतेला उत्तरदायी सरकार देत आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि एनडीएने एक नवी संस्कृती, राजकारणाची नवी व्याख्या निर्माण केली आहे. केंद्र ते राज्य, आमच्या सरकारने जे सांगितले, ते सर्व केले आणि जे सांगितले नाही तेही केले,' असा दावा नड्डांनी यावेळी केला.
राहुल गांधींवर काय म्हणाले?ते पुढे म्हणतात, 'आज राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरतात. मात्र त्यांनी राज्यघटना कधीच वाचली नाही, ते फक्त हातात घेऊन फिरतात. धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिले आहे, मात्र आज काँग्रेस पक्ष कर्नाटकात खाजगी कंत्राटदारांना टेंडर देताना अल्पसंख्याकांना 4 टक्के आरक्षण देत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलजेपी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मी आपला पक्ष बंद करेल, पण काँग्रेसशी तडजोड करणार नाही. पण आज उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे नेले. सत्तेसाठी तुमच्या वडिलांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून तुम्ही काँग्रेसशी ज्या प्रकारे तडजोड केली आहे, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.'
आर्थिक आघाडीवर देश मजबूत झाला'आर्थिक धोरणाच्या आघाडीवर जगाला पंतप्रधान मोदींमध्ये आशेचा किरण दिसत आहे. 10 वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावर होती, पंतप्रधान मोदींनी ती पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली. महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती हा महाराष्ट्राला उजळून टाकणारा 'उगवता सूर्य' आहे. तर महाविकास आघाडी महाराष्ट्राला अंधारात ढकलणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. तुम्ही महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन करा, पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,' असा दावाही त्यांनी केला.