Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. काल रात्री राहुल यांची वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे एक सभा पार पडली. या सभेत एक विचित्र प्रकार घडला आणि त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपा आणि सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आले. एका व्हिडीओनुसार, राहुल गांधींच्या सभेत भारताच्या ऐवजी काहीतरी वेगळेच गीत वाजल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील वाशिममध्ये राहुल गांधींचा हा कार्यक्रम झाला. तेथे मंचावरून भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यास सांगण्यात आले. राहुल गांधींसह सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहिले होते. पण त्यानंतर जे घडले ते फारच विचित्र होते.
राहुल गांधी यांच्या सभेच्या वेळी राष्ट्रगीत लावले जाणार होते. सारेच जण राष्ट्रगीतासाठी सज्ज होते. पण तशातच एक वेगळेच संगीत सुरू झाले. भारताच्या राष्ट्रगीताऐवजी त्या सभेत वेगळ्याच प्रकारचे गीत सुरू झाले. सहसा चुकून लावले जाणारे गीत हे एखाद्या चित्रपटाचे गीत वैगेरे लागू शकते. पण त्या सभेत मंचावर चक्क नेपाळचे राष्ट्रगीत वाजू लागले. सुरुवातीची काही सेकंदे केवळ संगीत होते, त्यानंतर जेव्हा शब्द सुरू झाले त्यावेळी राहुल गांधींच्या ही बाब लक्षात आली की हे भारताचे राष्ट्रगीत नाही. त्यानंतर त्यांनी लगेचच स्टेजजवळ उभ्या असलेल्या नेत्यांना हे गीत थांबवण्यास सांगितले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपा नेते अतुल भातखळकरांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
--
राहुल गांधींनी नेत्यांना नेपाळचे राष्ट्रगीत थांबवण्यास सांगत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे, मात्र राहुल गांधींना काय म्हणायचे आहे हे नेत्यांना सुरूवातीला समजलेच नाही. यावर भाजपाने राहुल गांधींवर निशाणा साधला. 'ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत,' असे भातखळकरांनी ट्विटमध्ये म्हटले. तर महाराष्ट्राचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत, 'पप्पू की कॉमेडी सर्कस' म्हटले आहे. भाजपाचे तामिळनाडूचे नेते अमर प्रसाद रेड्डी यांनीही हा व्हिडिओ ट्विट करून राहुल गांधींना विचारले आहे की, हे काय आहे? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही यूजर्सने राहुल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.