ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ९ - देशातील सर्व ज्वेलर्सचा गेल्या ४० दिवसापासून संप सुरु आहे. भाजपा सरकारने बजेटमध्ये ज्वेलर्सवर १% अबकारी कर लादला आहे. त्याच्या विरोधात संपुर्ण भारतातील ज्वेलर्सने विरोध दर्शवून संप सुरु केला आहे. देशातील हा सर्वात जास्त दिवस चालणारा मोठा संप आहे. मुंबईतील सर्व ज्वेलर्सना पाठींबा देण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी व त्यांना साथ देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी १२ एप्रिलला झवेरी बाजारला भेट देणार आहेत. राहुल गांधी त्यादिवशी सर्व ज्वेलर्सशी थेट संवाद साधणार आहेत, तसेच सकाळी ११ वाजता प्रथम देवनार डम्पिंगला भेट देणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला माजी खासदार मिलिंद देवरा, ज्वेलर्स असोसिएशनचे कुमार जैन व पदाधिकारी, मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील आणि जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे उपस्थित होते.
ज्वेलर्सच्या व्यवसायावर ७ करोड कुटुंब अवलंबून आहेत. भाजपा सरकार हा व्यवसाय नष्ट करण्याचे षड्यंत्र रचत आहे. काही दिवसापूर्वी ज्वेलर्सच्या काही संघटना वित्तमंत्री अरुण जेटली यांना भेटायला गेले, परंतु त्यांनी त्यांच्याशी नीट चर्चा देखील केली नाही. भाजपा सरकार हे व्यापाऱ्यांची पार्टी समजली जाते, परंतु या सरकारने व्यापाऱ्यांचे हाल केले आहेत. काँग्रेस मात्र ज्वेलर्सच्या पाठीशी आहे. म्हणूनच ज्वेलर्सच्या संघटनांनी राहुलजी गांधी यांना आमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले आहे. मंगळवारी १२ एप्रिल रोजी राहुलजी गांधी दुपारी २ वाजता झवेरी बाजारला भेट देणार आहेत व चर्चा करणार आहेत अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले कि, राहुल गांधी १२ एप्रिलला सकाळी ११ वाजता प्रथम देवनार डम्पिंगला भेट देणार आहेत. तेथील सत्यस्थिती व समस्या जाणून घेणार आहेत. देवनार डम्पिंगमुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. अनेक रोगाराई पसरली आहे. परंतु राज्य सरकार व मुंबई महानगर पालिका संपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा म्हणाले कि, राहुल गांधी यांनी ज्वेलर्सच्या दिल्लीतील जंतरमंतर वरील मोर्चाला हि भेट देऊन त्यांना समर्थन व पाठींबा दिला होता. आता मुंबईतील झवेरी बाजारला हि भेट देणार आहेत. भाजपा सरकार जाणूनबुजून ज्वेलर्स व्यवसायाची छबी खराब करत आहे. २०१२ सालीही राहुल गांधी यांनी ज्वेलर्सना पाठींबा दिला होता आणि आता ही ते ज्वेलर्सच्या बाजूने आहेत. मी या विभागाचा पूर्व खासदार आहे. परंतु आम्ही राजकारण बाजूला ठेऊन यांना पाठींबा देत आहोत. २२ मार्च मी सर्व ज्वेलर्सची भेट घेऊन समर्थन दिले आहे. या व्यवसायावर अवलंबून असणारे छोटे मोठे ज्वेलर्स व सुवर्ण कारागीर यांच्यावर हे खूप मोठे संकट आहे. भाजपा सरकारने तत्काळ हा अबकारी कर मागे घेतला पाहिजे व व्यापाऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.