मुंबई - भाजपा नेत्यांकडून तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिलेल्या धमकीविरोधात काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, राहुल गांधी हे संयमी नेते आहेत पण भाजपा त्यांच्यावर जीवावर उठले आहे, त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, ईंट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी सातत्याने हिंसेचा विरोध करून ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ सुरु केली. केंद्र सरकारने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना राहुल गांधी यांनी ४००० किमीची पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलवून टाकले. देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी ही यात्रा काढली. राहुल गांधी हे संयमी नेते आहेत पण भाजपा त्यांच्यावर जीवावर उठले आहे, त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, ईंट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा पटोले यांनी दिला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत त्यामुळेच घाबरलेला भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते त्यांना सातत्याने जीवघेण्या धमक्या देत आहेत, पण राहुलजी गांधी अशा धमक्यांना घाबरत नाहीत असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आज काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे, विधानसभा निवडणुका मविआ एक होऊन लढणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून या भागात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल व नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरवात महाराष्ट्रातून होईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.