नांदेड/परभणी : देशात जातीय विष पेरले जात असून, हरयाणात जाटविरोधी इतर तर महाराष्ट्रात मराठाविरोधी अमराठा असा वाद पेटवला जात आहे़ सत्तेसाठी भाजपा द्वेष पेरत असून त्यापासून सावध राहा, असा घणाघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड व परभणी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्द्यांवरून त्यांनी भाजपा व मोदी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून राज्यात आणि देशात एनडीएचे सरकार आहे़ या काळात महाराष्ट्रात तब्बल ९ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली आहे़ गुजरातमध्ये नॅनो प्रोजेक्टसाठी एका व्यक्तीला ६५ हजार कोटी रुपये दिले़ या कंपनीच्या गाड्या कुठेच दिसत नाहीत़ मात्र दुसरीकडे शेतकरी अडचणीत असताना कवडीही मिळत नाही.काँग्रेसच्या योजनाच भाजपा आपल्या नावावर खपवीत आहे़ जीएसटीचा गवगवा होत आहे़ पण जीएसटी आम्हीच आणली. १८ टक्केपेक्षा जास्त कर नसावा, अशी आमची भूमिका होती़ या सरकारने हा टॅक्स २८ टक्क्यांवर नेला असून ५ प्रकारे करवसुली करून सामान्यांना अडचणीत आणले आहे़ नोटाबंदीचा फुगाही फुटला आहे. एक वर्षानंतर ९९ टक्के पैसे रिझर्व्ह बँकेकडे परत येत असतील तर काळा पैसा गेला कुठे, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात शेतकºयांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेताना शेतकºयांची जात का विचारली जात आहे, असा सवाल करून देशात काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहिलेली दिसेल, असा विश्वासही खा. गांधी यांनी व्यक्त केला़
सत्तेसाठी भाजपाकडून जाती-धर्मात तेढ , राहुल गांधी यांचा हल्लाबोल; नांदेड, परभणीत काँग्रेसने केले जोरदार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 5:03 AM