राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याचे पडसाद, विधानसभेत सभात्याग, पायऱ्यांवर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:29 AM2023-03-25T05:29:08+5:302023-03-25T07:58:01+5:30
भारत जोडो यात्रेनंतर भाजप राहुल गांधींना जास्तच घाबरू लागला आहे.
मुंबई : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधानसभेतून सभात्याग करत निषेध केला. लोकशाहीच्या विरोधात हा निर्णय असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
विधानसभेतून सभात्याग केल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर केंद्र सरकार आणि भाजपविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी काळ्या फिती लावून विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतला.
कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भाजप सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे...
भारत जोडो यात्रेनंतर भाजप राहुल गांधींना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत त्यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली आहे. केम्ब्रिज विद्यापीठातील विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माइक बंद करण्यात आला. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे, याचा हा पुरावा असल्याची
टीका विधिमंडळातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
लोकशाहीला धक्का
मतमतांतरे असूू शकतात; परंतु खासदारकी रद्द करणे संविधानात, लोकशाहीत बसत नाही. लोकसभेने घेतलेला हा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.