पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अतिश्रीमंत उद्योगपतीच्या मद्यप्राशन केलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून अपघात घडवल्याने दुचाकीवरील तरुण, तरुणीचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवल्याने या घटनेची आता देशभरात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारवर टीका केली होती. बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. मात्र राहुल गांधी यांनी आरोपीबाबत केलेला हा दावा गैरसमजातून केला असल्याचं विधान प्रख्यात वकील असीम सरोदे यांनी केला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना असीम सरोदे म्हणाले की, राहुल गांधी यांचा गैरसमज झाला आहे. तसा तो सगळ्यांचाच झालेला आहे. या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे. त्याला मोकळं सोडलेलं नाही. त्यामुळे जामीन करत असताना जुवेलनाईन जस्टिस अॅक्टमध्ये जामीन करताना सुधारणावादी शिक्षेची किंवा अटींची तरतूद आहे. त्यामुळे आरोपीला काही अटींवर सोडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनीच निबंध लिहिला की सोडतील, असा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे. त्यामुळे लोकांनी पण त्याबाबत विचार केला पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनी जे काही ट्विट केलं आहे किंवा व्हिडीओ केला आहे. त्यामागेसुद्धा गैरसमज आहे, असं दिसतंय. आरोपीला सोडूनच दिलंय, असा त्यांचा समज झालेला आहे, असे असीम सरोदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की, जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसेल, जर तो १८ वर्षांच्या आत असेल, तरीही त्याला दारू पिण्यासाठी पबमध्ये जाऊ देणं. त्यानंतर त्याने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं पालक म्हणून त्यांच्या अपयशाचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणी पालकांची चौकशी झाली पाहिजे. तसेच कार विकत घेऊन एवढे दिवस झाल्यानंतरही तिची नोंदणी का करण्यात आली नाही, हा एक मुद्दा आहे आणि मुलाकडे लक्ष का दिलं नाही हाही मुद्दा आहे. यात कायद्याचे एक दोन मुद्दे आहेत जे कुणीच लक्षात आणून दिले नसतील. त्यानुसार या प्रकरणात दोन एफआयआर असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दारुबंदी कायद्याचं एकही कलम लावलेलं नाही, याकडेही असीम सरोदे यांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, पुण्यातील घटनेवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असे राहुल गांधींनी म्हटलं होतं.