अकोला - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेला राज्यातील महाविकास आघाडीचे नेते हजेरी लावत आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या विधानावरून भाजपा, मनसे आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचा निषेध म्हणून पुतळे जाळण्यात येत आहेत. त्यात मनसेने शेगाव येथील सभेत निषेध करणार असल्याचं म्हटल्यानंतर आता युवक काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.
याबाबत राज्यातील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले की, ज्याप्रकारे मनसेने आमच्या सभेत येण्याचं आव्हान दिलंय, आमचेही कार्यकर्ते ताकदीने तिथे उपस्थित राहणार आहे. शेगाव येथे राहुल गांधींची खूप मोठी सभा होईल. जे अंदमान-निकोबारमध्ये युद्ध घडलं तिथे मराठा सैनिक मोठ्या प्रमाणात वीर झाले. त्यांच्याऐवजी माफीवीरांची आठवण त्यांना येते. त्याचा आम्ही निषेध करतो असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आम्ही ताकदीने युवक काँग्रेस कार्यकर्ते सभेत असतील. मनसे ज्या भाषेत विरोध करेल त्याच भाषेत उत्तर देऊ. आमचे जवळपास ३० हजार युवक काँग्रेस सभेच्या ठिकाणी असणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त लोक उपस्थित असणार आहे. त्यामुळे शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?अकोला येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, 'माझ्याकडे सावरकरजींचे पत्र आहे, जे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला लिहिले होते. त्यात त्यांनी इंग्रजांना सेवक होण्याची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि मोहन भागवत यांनी हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती,' असा दावा राहुल गांधी यांनी केला. 'या पत्रावर सावरकरजींनी सही केली होती. गांधीजी, नेहरूजी आणि पटेलजीही तुरुंगात होते, अशा पत्रावर कोणीही सही केली नव्हती,' असंही राहुल म्हणाले. तसेच, 'या यात्रेमुळे देशाचे नुकसान होत आहे, असे त्यांना वाटत असेल तर यात्रा थांबवून दाखवावी. आमच्या राजकारणात आणि भाजपच्या राजकारणात हाच फरक आहे. भाजप दबाव टाकत आहे, आम्ही हुकूमशाही मानत नाही,' अशी टीकाही राहुल यांनी केली.
मनसे करणार निषेध काँग्रेसची भारत जोडो यात्रा बुलढाण्यात असणार आहे. या ठिकाणी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना जमा होण्याचे तसेच शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा, असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचं सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"