नवी दिल्ली : काँग्रेसचा सफाया होणार असल्याचे भाकित एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आले असतानाच राहुल गांधींच्या बचावासाठी काँग्रेस समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो राहुल गांधींना दोष देता येणार नाही. पराभव झाल्यास ती सामूहिक जबाबदारी असेल, असे या पक्षाने स्पष्ट केले.राहुल गांधी हे सरकारमध्ये नाहीत. ते पक्षात दुसर्या क्रमांकाचे नेते आहेत. सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष आहेत. स्थानिक नेतृत्वही असते, त्यामुळेच जबाबदारी सामूहिक ठरते, असे काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी स्पष्ट केले. निकाल अपेक्षित लागला नाही तर निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणारे राहुल गांधी किंवा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापैकी कुणाला जबाबदार धरले जाईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. एक्झिट आणि ओपिनियन पोलचा अंदाजही अहमद यांनी फेटाळून लावला. २००४ आणि ०९ मध्ये सर्व अंदाज खोटे ठरले होते; त्यामुळे आमचा पक्ष निकालाच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ मेपर्यंत प्रतीक्षा करेल, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावून रणनीतीवर चर्चा केल्यानंतर अहमद यांनी एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत प्रतिक्रिया दिली.विरोधात कोण बसणार?काँग्रेसने विरोधात बसावे, असा सूर भाजपने लावला आहे. त्याबद्दल अहमद टोला लावताना म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींसह काही भाजपचे नेते सरसंघचालकांना भेटले आहेत. मोदींनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवावे की गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहावे, यावर तोडगा काढणे सुरू आहे.
निकाला आधीच काँग्रेसकडून राहुल गांधींचा बचाव
By admin | Published: May 12, 2014 11:51 PM