मुंबई - वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर संविधान सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित असतील. या सभेचे निमंत्रण काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनाही देण्यात आले. परंतु काही कारणास्तव राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकत नाही मात्र त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, संविधान सन्मान सभेचे निमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या मेळाव्याचे आयोजन केले त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत. गेल्या ९ वर्षापासून घटनेच्या मुलभूत अधिकारांवर सातत्याने हल्ला होत आहे. आज देशात चिंताजनक स्थिती आहे. अशावेळी संविधानाचे संरक्षण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे मी आजच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत असं त्यांनी म्हटलं.
तर संविधान सन्मान सभेसाठी पाठवलेल्या निमंत्रणाला राहुल गांधींकडून उत्तर मिळाले. सध्या अन्य राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे त्यांना उपस्थित राहता येत नाही. परंतु काँग्रेस पक्षाकडून पर्यायी नावे सुचवली नाहीत. तरी तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला आणि काँग्रेसला निवडणुकीत यश मिळो अशा आमच्या शुभेच्छा आहेत असं वंचितने राहुल गांधींच्या पत्रावर म्हटलं आहे.
दरम्यान, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले होते पण ते तेलंगणात प्रचारात असल्याने मी राहुल गांधी यांचा प्रतिनिधी म्हणून वंचितच्या सभेला उपस्थित राहणार आहे.देशाचे संविधान धोक्यात आहे. जे जे संविधान व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस राहील. म्हणूनच मी या सभेला जातोय असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
राहुल गांधी तेलंगणात
काँगेस नेते राहुल गांधी आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या ते प्रचारसभा घेणार आहेत. शनिवारी विशेष विमानाने राहुल गांधी यांचे आगमन नांदेड विमानतळावर झाले यावेळी माजी मंत्री अशोक चव्हाण आणि अन्य काँगेस नेत्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. नांदेड विमानतळावरुन हेलिकॉप्टरने राहुल गांधी आणि अशोक चव्हाण तेलंगणाला रवाना झाले. तेलंगणातील बोधन अदिलाबाद आणि अन्य ठिकाणी राहुल गांधी काँगेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.