माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजा नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर घणाघाती टीका केली. यावेळी शिवसेना कुणाची याबाबतचा निर्णय देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांवर घणाघाती टीका केली. तसेच राहुल नार्वेकर यांचा उल्लेख लबाड असा केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बाळासाहेबांचा एकतरी विचार सोडला असं वाटत असेल तर मला सांगा. जसं मुख्यमंत्रिपद सोडलं त्याप्रमाणे हे पदही सोडून देतो. तसेच त्या लबाड नार्वेकरांना सांगा. हिंमत असेल तर इथे येऊन बोला आणि शिवसेना कुणाची आहे ते सांगा. हवंतर मी सोबत येतो. बंद दाराआड कसले निर्णय देता? ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही म्हणून सांगता त्याचे पुरावे आम्ही जनता न्यायालयात दिले आहेत. तुम्ही पाहिले आहेत की नाही? पाहिले नसतील तर पुन्हा दाखवतो. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही. शिवसेनेमध्ये अमुकच नाही, असं हे सांगतात. पण २०१३ मध्ये हे महोदय तिथे उपस्थित होते. पण इथे जमलेला जनसमुदाय हीच शिववसेनेची घटना आहे. इथे जमलेल्या माता भगिनींचे आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी भाजपावरही उद्धव ठाकरेंनी टीकेचा घणाघात केला. २०१४ मध्ये भाजपने युती तोडली, १५ दिवसात ६३ आमदार निवडून दिले. २०१४ साली दिल्लीत उद्धव ठाकरे एकटे काही करणार नाही असा विचार सुरू होता. त्यामुळे आम्हाला संपवण्याचा डाव होता. अमित शहा यांनी वचन मोडलं. फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. पाव मुख्यमंत्री झाले नसते. महाराष्ट्रात वारंवार यायची गरज नसती पडली. पक्ष चोरता तुम्ही. अजूनही काश्मिरमध्ये हत्या सुरूच आहे. पंतप्रधानांबरोबर चांगले संबध होते, निवडणूक होत असते, जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो. आम्हाला संपवायची भाषा करता, मी आणि मीच ही भाषा सोडा, अशा इशाराही त्यांनी दिला.