“संजय राऊतांच्या टीकेला कुणीही महत्त्व देत नाही, त्यांचा कायद्याचा अभ्यास...”: राहुल नार्वेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 04:43 PM2023-05-10T16:43:02+5:302023-05-10T16:43:59+5:30
Maharashtra Politics: दोन-तीन टर्म खासदार म्हणून काम केले. पण, बोलाल त्याला काहीतरी आधार असायला हवा, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही कायदेतज्ज्ञ १६ आमदार अपात्र ठरून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा करत आहेत. तर काही कायद्याचे जाणकार आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, असा दावा करत आहेत. अवघ्या काहीच दिवसांत सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. मात्र, यातच आता विधिमंडळातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलेच सुनावले आहे.
आमदार अपात्रतेचा निर्णय केवळ विधानसभा अध्यक्ष कायद्याच्या तरतुदींचे पालन केल्यावर घेऊ शकतात. न्यायालयाचा लवकरच निकाल अपेक्षित आहे. आपण संविधानाच्या तरतुदींनुसार आणि एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला मान राखायला पाहिजे आणि त्याने दिलेल्या निकालाचे स्वागत करुन तो मान्य करायला पाहिजे, असे आवाहन राहुल नार्वेकर यांनी केले.
संजय राऊत यांचा संविधानाचा अभ्यास कच्चा
संजय राऊत यांच्या टीकेची लोक किती दखल घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. बिनबुडाच्या टीकांना उत्तर देण्याची गरज नाही. संजय राऊत यांचा संविधानाचा अभ्यास अत्यंत कच्चा दिसून येतोय. ते संविधानाच्या तरतुदींची माहिती न घेत वक्तव्य करत आहेत. संविधानात स्पष्ट तरतूद आहे की, विधानसभा अध्यक्षांचे ऑफिस जेव्हा रिक्त असते किंवा विधानसभा अध्यक्ष कार्यरत नसतात त्यावेळी केवळ विधानसभा उपाध्यक्षांकडे सगळे अधिकार जातात. पण जेव्हा विधानसभा अध्यक्ष पदावर येतात, किंवा कार्यरत असतात त्यावेळी उपाध्यक्षांकडे दिलेले अधिकार संपुष्टात येतात. ते अधिकार पुन्हा अध्यक्षांकडे येतात. आमदार अपात्रतेचा निर्णय केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात. हे विधानसभा अध्यक्ष म्हणून नाही तर कायद्याचा एक विद्यार्थी आणि संविधानाचे पालन करणारा म्हणून नागरिक म्हणून स्पष्टीकरण मांडत आहे. दोन-तीन टर्म खासदार म्हणून काम केले आहे. जे बोलाल त्याला काहीतरी आधार असायला हवा. पण काही व्यक्तींकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे, असा खोचक टोला राहुल नार्वेकर यांनी लगावला.