पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. यावरून विधीमंडळाने शरद पवार गटातील 8 आमदारांना नोटीस पाठवली आहे. या आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज सकाळीच दिल्लीला निघाले आहेत.
आमदार अपात्रताप्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. तिथे ते सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. आमदार अपात्रताप्रकरणी 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या. यामुळे नार्वेकरांना दिल्लीला जावे लागले आहे. नार्वेकरांनी तयार केलेले सुनावणीचे वेळापत्रक अमान्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच जर ३० ऑक्टोबरपर्यंत सुधारीत वेळापत्रक दिले नाही तर आम्ही देऊ, असे न्यायालयाने म्हटले होते.
राहुल नार्वेकर यांनी मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे. आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झालेली आहे, त्यानुसार नोटीसा दिलेल्या आहेत. वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन, असे नार्वेकर म्हणाले.