महाफैसला! काऊंट डाऊन सुरू; आमदार अपात्रता निकालाचं Live प्रक्षेपण पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:05 PM2024-01-10T16:05:07+5:302024-01-10T16:11:51+5:30
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे
मुंबई - राज्यातील सत्तानाट्यात आज महत्त्वपूर्ण दिवस उजाडला आहे. त्यात ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांविरोधात दिलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर आज निकाल लागणार आहे. गेल्या २ महिन्यापासून सातत्याने अपात्रतेबाबत अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली. या दोन्ही गटाच्या आमदारांची साक्ष आणि पुरावे तपासण्यात आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणात ४.३० च्या सुमारास निकाल देणार आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण आजच्या निकालावर महाराष्ट्रातील पुढची राजकीय गणिते ठरणार आहेत. या निकालाचे लाईव्ह प्रेक्षपण सर्वसामान्य प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे. विधिमंडळाने त्याची सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. तत्पूर्वी निकालाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहे. हा निकाल मॅच फिक्सिंग असेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचसोबत आमदार नितीन देशमुखांनी तर राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्याकडून बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आमचा विजय होईल असा विश्वास वर्तवला आहे. त्यामुळे निकाल नेमका काय लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
निकालाबाबत काय म्हणतायेत राजकीय नेते?
मॅच फिक्सिंग झालीय असं म्हणणं घटनात्मक संस्थेचा अपमान आहे. संजय राऊतांना प्रक्रिया माहिती नाही. ज्यावेळी साक्ष झाली त्या नोंद केल्या जातात. त्यावर सही घेतली जाते. घटनेच्या आधारे निर्णय घेतला जातो. घेतलेला निर्णय कोर्टात जाऊन टिकावा लागतो. हे त्यांना माहिती नसल्याने अशाप्रकारे टीका करतात. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास, भारतात लोकशाही परंतु पक्षात लोकशाही मानली जात नाही. सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल - दीपक केसरकर, मंत्री, शिंदे गट
निकालाची प्रत अधिकृत दिली जाईल. त्यामुळे निकालाला तिथे हजर राहण्यापेक्षा जो निकाल येईल तो विधिमंडळाच्या पावित्र्याला धरून असला पाहिजे. आमचा पक्ष तळागाळातला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख भविष्यातील पुढची वाटचाल मजबूत असेल यासाठी प्रयत्न करत आहेत - सुनील शिंदे, ठाकरे गट आमदार
निकालाची मी काळजी करत नाही. जोपर्यंत जनता आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपण काम करत राहायचे. गंभीर कुठली चूक आम्ही केली नाही. समाजाच्या हिताने जो निर्णय करावा लागला त्यामुळे काळजी, भीती काही वाटत नाही. निकाल काहीही लागला तरी काय करू शकतो - अनिल बाबर, शिंदे गट आमदार
ही लढाई सत्याची आहे. आम्हाला २ आमदार भेटले, एक अजित पवार, शिंदे गटाचे. तुम्ही अपात्र होणार असं आम्हाला सांगितले. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार आहेत. या निर्णयाविरोधात आम्ही लोकांमध्ये जाऊ. हा निकाल आधीच ठरवला आहे. सत्तेचा कसा दुरुपयोग होतोय आणि जी स्क्रिप्ट आहे त्यानुसार सगळे होतंय - वैभव नाईक, ठाकरे गट आमदार
निकाल लाईव्ह पाहा