Rahul Narvekar News: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी या नोटिसीला आपले उत्तर पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला दिरंगाई होत असल्याबाबत ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. यातच सुनावणीला दिरंगाई होणार नाही. योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा दावा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या आमदारांनी नोटिसीला उत्तर दिले आहे.
योग्य निर्णय घेतला जाईल
आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करणार आहोत. दरम्यान अपात्रतेबाबत सुनावणी करण्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कॉमनवेल्थ पार्लयामेंट्री एसोसिएशनची ९वी सभा ही उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आले होती. भारतातील सर्व पीठासीन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विधीमंडळात एक वेगळी राजशिष्टाचाराची शाखा निर्माण करण्यात यावी आणि प्रत्येक विधीमंडळाला शासनाकडून निधीची तरतूद सीपीएच्या कामाकरिता उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. म्हणाले. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे ते म्हणाले.