जानेवारीमध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे हे स्वत:पासून बोलत आहेत. राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. 10 तारीख हा निकालाचा दिवस आहे आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे, अशा शब्दांत समाचार घेतला आहे.
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीवर बोलताना राऊत म्हणाले की, माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्या इतके ते मोठे नाहीत, ते मुख्यमंत्री जरूर आहेत. यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. धुळे दौऱ्यावर असताना राऊत पत्रकारांशी आज बोलत होते.
राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये, नाहीतर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघडा करावा लागेल. मुंबई महानगरपालिकेची 90 हजार कोटींची तिजोरी कोणी लुटली असा देखील प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला. राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुका तुम्ही पराभवाच्या भीतीने घेत नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांनी तुमच्याकडे चिन्ह असलेली शिवसेना आहे तर मग निवडणुका का घेत नाहीत, असा प्रश्न भाजप समोर उपस्थित केला आहे.
पंतप्रधान, मंत्र्यांना प्रचारावर बंदी घालावी...घोषणा आश्वासन आणि प्रचार ही पंतप्रधानांची त्रिसूत्री असून त्यांनी शपथ घेतल्यापासून दहा वर्षात त्यांनी फक्त प्रचारच केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे. तसेच निवडणुकीच्या तीन महिने आधी पंतप्रधान आणि मंत्र्यांना प्रचारासाठी बंदी घातली पाहिजे, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि त्यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात मागणी देखील केलेली होती. राज्य सरकारचा पैसा ही मंडळी प्रचार करण्यासाठी वापरत असल्याने हा सर्व खर्च त्यांच्या पक्षाकडून वसूल करण्यात यावा, अशी देवी देखील भूमिका आमची असणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.