राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:43 IST2024-12-09T11:42:33+5:302024-12-09T11:43:15+5:30
अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षासाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही भांडण झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे मानले आभार
मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. त्यात नार्वेकरांची एकमताने निवड करण्यात आली. काही अपवाद वगळता विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड यावेळी पार पडली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले त्याशिवाय अध्यक्ष पदावर विराजमान झाल्याबद्दल राहुल नार्वेकरांचं कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हटलं नव्हते तरी तुम्ही परत आलात त्याचा मनापासून आनंद आहे. तुमच्यासारखा निष्णांत वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला त्यामुळे याला न्याय देण्याचं काम तुमच्याकडून होईल यात शंका नाही. राहुल नार्वेकर कदाचित पहिलेच आमदार असतील जे पहिल्या टर्ममध्ये अध्यक्ष बनले, दुसऱ्या टर्ममध्येही अध्यक्ष बनले. नानाभाऊंनी वाट मोकळी केल्याने ते मागील वेळी विधानसभा अध्यक्ष बनले असा चिमटा काढत त्यांनी नाना पटोलेंचे आभार मानले.
त्याशिवाय गेले ५ वर्ष महाराष्ट्रातील राजकारणाचा संक्रमण काळ होता. त्यात घडलेल्या घडामोडीमुळे पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षाकडे सर्व माध्यमात ते चर्चेत होते. सर्वाधिक चर्चेत राहुल नार्वेकर होते. त्यांच्या रुपाने अभ्यासू व्यक्तिमत्व विधानसभा अध्यक्षपदी निवडले गेले. मुंबई, कोकणात अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला त्याच मांदियाळीत आज नार्वेकरांचे नाव जोडले जातेय. मागील वर्षात अध्यक्षांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. संपूर्ण ज्ञानाचा कस तेव्हा लागला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान मिळवणाऱ्या चौघांपैकी राहुल नार्वेकर हे एक आहेत. अतिशय युवा वयात विधानसभा अध्यक्ष झालात. अध्यक्षांना कायद्याचं उत्तम ज्ञान आहे. सभागृहाचं कामकाज नियम, प्रथा, परंपरेनुसार चालते. सभागृहात अनेकदा पेच प्रसंग येतात. कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे विरोधकांना येते. अध्यक्षांना नव्हे तर सरकारला अडकवायचे असते. अडीच वर्षात अध्यक्षांनी वेगळी कारकिर्दी आणि प्रतिमा तयार केली. या सभागृहात बऱ्याच दालनाचा त्यांनी चेहरा बदलून दाखवला. पैसा खर्च करून अनेकवेळा उत्तम काम होत नाही. ४०-५० वर्ष जुने सभागृह जिथे राहुल नार्वेकरांची दृष्टी गेली तिथे नवीन गोष्टी तयार झाल्या असं फडणवीसांनी सांगितले.
विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडेल त्या आम्ही स्वीकारू
अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षासाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही भांडण झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. सभागृहातील सगळ्या सदस्यांसाठी राहुल नार्वेकरांचे अध्यक्षांचे दालन सर्व पक्षातील सर्व सदस्य सातत्याने जायचे. कितीही भांडण झाले तरी अध्यक्षांच्या दालनात वाद संपलेले असायचे. अध्यक्ष दोन्ही बाजूचे ऐकतात. यावेळीही अध्यक्षांकडे ही जबाबदारी आहे. लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणे हे सृदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. संख्याबळ न पाहता महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल ते स्वीकारण्याची जबाबदारी आम्हीही घेतली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.