Rahul Narvekar Vidhansabha: राहुल नार्वेकरांविरोधातील अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारला; विरोधकांचा विधानसभेत दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 08:46 AM2023-02-28T08:46:37+5:302023-02-28T08:47:01+5:30
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकतर्फी कारभार चालवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडलेला अविश्वास ठराव अध्यक्षांनी नाकारला आहे. हा प्रस्ताव विधानसभेत न नाकारता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांना एक पत्र पाठवून नाकारल्याचे कळवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या भूमिकेवर पटोले यांनी आक्षेप घेतला असून चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव नाकारल्याचा दावा केला आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकतर्फी कारभार चालवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, विधिमंडळ सचिवालयाने यासंदर्भात पटोले यांना पत्र पाठवून अध्यक्षांनी या प्रस्तावाला अनुमती नाकारली असल्याचे कळवले आहे. यासाठी विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या दिवशी म्हणजेच ४ जुलै रोजी विरोधकांनी अध्यक्षांविरोधात दिलेल्या एका पत्राचा दाखला दिला आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला ४ जुलै २०२२ रोजी आमच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. तो अविश्वास प्रस्ताव नव्हता. २९ डिसेंबर २०२३ रोजी आम्ही दिलेला अविश्वास प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नाकारण्यात आला. विधिमंडळ कामकाजाला काळिमा फासण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्या अविश्वासाच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडणार आहोत.
- नाना पटोले, आमदार, काँग्रेस