विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस घाना देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतू, आज ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभुमीवर अचानक नार्वेकरांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. दौरा रद्द करण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाहीय.
आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत रोडमॅप सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार, विधानसभा अध्यक्षांच्या वतीन सर्वोच्च न्यायालयात रोडमॅप सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या रोडमॅपवर आक्षेप घेत थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. अपात्रता मुद्दा सोडून इतर विषयात अध्यक्ष वेळ घालवत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचा आहे. विधासभा अध्यक्षांनी जाहीर केलेले वेळापत्रक आणि होणारा विलंब पाहता ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ०६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत हा मुद्दा मांडला जाणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात आफ्रिकेतील घाना या देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. यामुळेच नार्वेकरांनी दौरा रद्द केल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी ठाकरे गटाकडून हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यात होणार विलंब पाहता ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वेळापत्रक सादर करण्यासाठी दोन आठवड्यांना वेळ देण्यात आला होता. त्यावर ३ ऑक्टोबरला सुनावणी करण्यात येणार होती, पण ही सुनावणी ६ ऑक्टोबर या दिवशी ढकलण्यात आली.