...तर राहुलच्या पंतप्रधान पदाला विरोध नाही - राष्ट्रवादी काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:47 AM2018-05-09T05:47:16+5:302018-05-09T05:47:16+5:30
देशाच्या पंतप्रधान पदासाठी जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संधी दिल्यास त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वत: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे वारंवार सांगितले आहे.
मुंबई - देशाच्या पंतप्रधान पदासाठी जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संधी दिल्यास त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वत: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे त्या पदासाठी आम्ही कधीही दावेदार राहणार नाही, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
कर्नाटक प्रचारात व्यस्त असणाऱ्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाची उमेदवारी स्वीकारण्याबाबतचे वृत्त झळकताच उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरल्यास आपण पंतप्रधान पद स्वीकारू, असे राहुल यांनी म्हटले. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार माजिद मेमन यांनी हरकत घेत शरद पवार हेच पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार असल्याचा दावा केला. भाजप विरोधातील आघाडीसाठी काँग्रेस पूर्वअट घालू शकत नाही, असेही मेमन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. त्यांच्या विधानानंतर राहुल यांच्या पंतप्रधान पदाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याची चर्चा सुरू झाल्याने प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
तत्पूर्वी, मेमन यांनी पवार हेच पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार असल्याचे म्हटले होते. सुरुवातील बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस आघाडीची चर्चा होती. परंतु, पवार यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपाविरोधात विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू झाले आणि राहुल यांचे नाव चर्चेत आले. त्यामुळे भाजप विरोधातील आघाडी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करेल, असे वाटत नसल्याचे मेमन म्हणाले. राहुल गांधींसह ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू अशा अनेक नेत्यांना
पंतप्रधान पदाची स्वप्ने पडत असली तरी पवार हेच योग्य उमेदवार असल्याचा दावा मेमन यांनी केला होता.
सत्ताबदल निश्चित
राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे विधान केले असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे मलिक म्हणाले. स्वत: पवार यांनी वारंवार हे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान पदावर आमची दावेदारी राहणार नाही. देशातील परिस्थिती पाहाता सत्ताबदल निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणाºया निकालानुसार त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.