ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून 500, 1000च्या नोटा रद्द केल्यानंतर अवैध व्यवसाय करणा-यांची चारही बाजूंनी चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे. यामुळेच आता काळा पैसा पांढरा करण्यासाठी ब-याच जणांनी निरनिराळ्या शक्कल लढवायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
अनेकांनी रेल्वेचे लांब पल्ल्याचे 50 हजारांपेक्षाही जास्त किमतीचे तिकिटांचे बुकींग सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. जळगावमध्ये तर केवळ 2 तासांमध्ये 5 लाखांचे तिकीट बुकींग झाल्याचे वृत्त आहे. याद्वारे बूक केलेले तिकीट रद्द करुन रेल्वेकडून रिफंड मिळवण्याची नामी शक्कल अनेकांनी लढवली आहे. मात्र, हे सर्व तिकीट बुकींग प्रकरणावर सरकारची करडी नजर आहे. याचाच एक भाग म्हणून 50 हजारांपेक्षा अधिक रकमेचं तिकीट बूक करणा-यांवर पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्यांचे 50 हजारांहून अधिक तिकीट बूक करुन काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांची धावाधाव सुरू असल्याचे प्रशासनाच्याही लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक पाऊल उचलण्यात आली आहेत.