मुंबई : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचार आणि अनियमितेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या साम्राज्यावर छापे घातले. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या चार शहरांतील घरे आणि कार्यालये अशा १६ ठिकाणांची एसीबीने झडती घेतली. या कारवाईत एसीबीच्या हाती मोठ्या प्रमाणात घोटाळ्यांसंबंधी कागदपत्रे लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या छाप्यांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने स्वत: भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज, पुतण्या समीर तसेच कंत्राटदार मेसर्स चमणकर यांच्यासह एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लगेच एसीबीने बांधकाम खात्यातील सात आजी-माजी अधिकाऱ्यांच्या घरी (पान ५ वर) शनिवारी छापे घातले. या अधिकाऱ्यांच्या घरातही कोट्यवधीचे घबाड सापडले होते. त्यानंतर एसीबीने आपला मोर्चा भुजबळ यांच्या मालमत्तेकडे वळवला.मंगळवारी सकाळी ९ वाजता भुजबळ कुटुंबियांच्या नावे असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील कार्यालय आणि बंगल्यांवर एसीबीने धाडसत्र सुरु केले. या कारवाईसाठी एसीबीने २५ ते ३० अधिकाऱ्यांची सात पथके तयार केली होती. त्यानुसार या पथकातील अधिकाऱ्यांनी मुंबईतील सात ठिकाणी छापे घातले. तर नाशिकमधील पाच ठिकाणी छापे घातले. मनमाड येथील भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेवरही एसीबीने छापा घातला. पुण्यातील दोन आणि ठाण्यातील तीन मालमत्तांवरही एसीबीने धाडी टाकल्या. याआधी दोनच दिवसांपूर्वी माहिती आयुक्त आणि बांधकाम विभागातील माजी सचिव दीपक बाळकृष्ण देशपांडे, बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव देवदत्त गंगाधर मराठे, मुख्य वास्तुविशारद बिपीन मुकुंद संख्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन अनंत सावंत, बांधकाम विभागाचे माजी सचिव माणिक हि. शहा, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय श्रीराम सोलंकी, अधीक्षक अभियंता अनिल ब. गायकवाड यांच्या घरांवरही एसीबीने छापे टाकले होते. या अधिकाऱ्यांच्या घरात सोने-चांदीसह महागडी वाहने, लाखो रुपयांची रोकड, अनेक घरांची आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील काही महत्त्वाची कागदपत्रे आढळली.छापे घालण्यात आलेली ठिकाणे...मुंबई १.सुखदा इमारत, फ्लॅट नंबर १९०१,पोचखाना रोड, वरळी२. मिलेशिया अपार्टमेंट, पाचवा मजला, फ्लॅट १७/१८, एम.पी. रोड, माझगाव३. माणेक महल, पाचवा मजला, चर्चगेट४. माणेक महल, सातवा मजला, चर्चगेट५. सागर मंदिर सोसायटी, पांडुरंग नाईक मार्ग, माहिम६. साईकुंज, फ्लॅट नंबर ४ आणि ७, दादर अग्निशामक केंद्रासमोर दादर, पूर्व७. सॉलिटेअर बिल्डिंग, सातवा मजला, एस.व्ही रोड, सांताक्रूझ-पश्चिमठाणे ८. लांजवती बंगला, प्लॉट नंबर ४६, पारसिक हिल, ठाणे९. मारुती पॅराडाईस, प्लॉट नंबर २९ बेलापूर, नवी मुंबईपुणे१०. फ्लॅट नंबर २०८, तिसरा मजला, संगमवाडी, पुणे११. लोणावळा येथील बंगलानाशिक१२. चंद्राई बंगला, भुजबळ फार्म, नाशिक१३. भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म, नाशिक१४. बंगला आणि कार्यालय, येवला, नाशिक१५. बंगला आणि कार्यालय, मनमाड, नाशिक१६. राम बंगला, भुजबळ फार्म, नाशिक‘खरेदीचा तपशील द्या, अन्यथा...’भुजबळ यांना त्यांच्या मालमत्तेच्या खरेदीचा तपशील सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाणार आहे. जर त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांची संपत्ती ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक असल्याचे गृहित धरुन भुजबळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला जाईल, अशी माहिती एसीबीने दिली. --------------------------------------
सूडबुद्धीने केलेली कारवाई - भुजबळमहाराष्ट्र सदन असो अथवा अन्य कोणतेही काम असो, यातला एकही निर्णय मी एकट्याने घेतलेला नाही. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने घेतलेले हे निर्णय आहेत. देशभरात सगळ्या राज्यांमध्ये अशाच पद्धतीने काम होते. मात्र सूडबुद्धीने मला टार्गेट केले जात आहे, असा आरोप माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला. -आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, पदाचा कसलाही गैरवापर केलेला नाही, असे सांगून ते म्हणाले, की राज्यात पायाभूत सुविधा समिती आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि त्यात विविध खात्यांचे मंत्री, मुख्य सचिव आणि अनेक विभागांचे सचिव सदस्य असतात. -या समितीने सगळे निर्णय विचार करून, चर्चा करून घेतले आहेत. असे असताना मी एकटाच कसा काय जबाबदार असू शकतो? आपल्याकडे ज्या जमिनी, घर, फ्लॅट आहेत, त्यांच्या आजच्या भावाने किमती दाखवल्या जात आहेत. माझ्या आजीने, मामाने दिलेले घर आणि जमीन जर आजच्या दराने मोजले जात असेल तर त्यामागे केवळ सूडबुद्धीच असल्याचे म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले.-----------------------खुल्या चौकशीचे आदेश आघाडी सरकारचे -मलिकमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी मंत्री सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या चौकशीचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच दिले होते, असा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी या चौकशीचे श्रेय घेण्याच्या फंद्यात पडू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.-------------------------मुख्यमंत्री म्हणतात, आगे आगे देखो होता हैं क्या! पुणे : छगन भुजबळ यांच्यावर सूडभावनेने कारवाई होत नसल्याचे सांगतानाच ‘आगे-आगे देखो होता हैं क्या,’ अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात बोलताना दिली. आमचे सरकार येण्यापूर्वीपासून भुजबळ यांच्यावर कारवाई सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसीबी चौकशी करीत आहे. त्यामुळे सूडभावनेचा प्रश्न येतोच कुठे, असेही ते म्हणाले. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या चौकशीला सरकार सवलत देत आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, की कोणत्याही प्रकरणात ज्या व्यक्ती दोषी असतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल. त्यामुळे थोडे थांबा आणि पुढे काय काय होते ते पाहा, असे सूचक विधानही त्यांनी केले.