- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यभरातील काही पेट्रोलपंपांवर ठाणे पोलिसांनी शनिवारी धाडी टाकल्या. ठाण्यासह नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, डोंबिवलीतील कारवाईमध्ये पेट्रोल पंप मालकास अटक करण्यात आली. पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाऱ्या मशिनमध्ये पल्सर नामक यंत्र असते. या यंत्रामध्ये हेराफेरी करून, ग्राहकांना कमी इंधन देण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई हाती घेण्यात आली होती. त्याची सुरुवात डोंबिवलीतील मानपाडा येथील पेट्रोल पंपापासून झ्करण्यात आली. येथील अरमान सेल्स पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्रीच धाड टाकून पंपाचे संचालक डेडिया यांना अटक केली. त्यानंतर, शनिवारी ठाण्यातील वागळे इस्टेटमधील इंडियन आॅइलच्या ऐकी आॅटो सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर धाड टाकली. पोलिसांनी येथे प्रसारमाध्यमांसमोर प्रात्यक्षिकही केले. त्या वेळी येथील मशिनमधून प्रत्येक ५ लीटरमागे २०० मिलिलीटर पेट्रोल कमी दिले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगमोहन आणि चेतन धवन यांच्या मालकीचा हा पेट्रोल पंप असून, येथील मशिनमध्ये विशिष्ट चिप बसविली होती. या पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक कानडे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतर ठिकाणच्या धाडींची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.पेट्रोलच्या चोरीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्यामुळे या कारवाईसाठी पोलिसांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणेचीही मदत घेतली. जवळपास दोन वर्षांपासून हा घोळ सुरू असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. हा पेट्रोल पंप सील केला असून, या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या वेळी पोलीस आयुक्त परमबिर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे आदींसह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.महिनाभरापासून करडी नजरउत्तर प्रदेशात अशाच प्रकारचा पेट्रोल घोटाळा उघडकीस आल्यानंतर, गेल्या महिन्यात तेथील विशेष कृती दलाच्या अधिकाऱ्यांनी ठाण्यातून दोघांना अटक केली होती. तेव्हापासून ठाण्याची गुन्हे अन्वेषण शाखा पेट्रोल पंपांवर करडी नजर ठेऊन होती.ग्राहकांच्या फसवणुकीची खात्री पटल्यानंतर पोलीस आयुक्तांनी राज्याच्या महासंचालकांना या संदर्भात माहिती देऊन, ठाण्यासह नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर धाडी टाकल्या.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : ग्राहकांच्या फसवणुकीसाठी पेट्रोल पंपांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मशिनमध्ये विशिष्ट चिप लावल्यानंतर ग्राहकांची फसवणूक करणे अतिशय सोपे होते. वाहनामध्ये पेट्रोल टाकताना किती प्रमाणात कमी द्यायचे, हे ठरवणेही या चिपमुळे सहज शक्य होते. पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी पेट्रोलपंपांचे नियमित निरीक्षण करीत असतात.
ठाणे पोलिसांचे पेट्रोल पंपांवर छापे
By admin | Published: June 18, 2017 12:53 AM