अलिबाग : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विनाअपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाने दक्षता घेतली होती. त्यामुळे गेल्या सात दिवसांत या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात यश मिळाल्याचा दावा आता केला जात आहे.
मुळात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १४ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक ठरत होता. पेण-वडखळ हा सात किलोमीटरचा प्रवास अपघात आणि वाहतूककोंडीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत होता. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणि आता परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र तैनात आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा वाहतूक पोलिस शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलिस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम केले. गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही उत्तम नियोजन केल्यामुळे अपघातांचे प्रसंग घडले नाहीत. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सवात अपघातांचे विघ्न दूर झाल्याचे मत कोकणवासियांमध्ये व्यक्त होत आहे.
१५० स्वयंसेवक आले धावून
गणेशोत्सवापूर्वी आणि या उत्सवकाळात पावसाने उघडीप दिल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्तेदुरुस्ती करता आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला नाही. मात्र ऊन आणि रस्त्यांवरील धुळीची तमा न बाळगता, पोलिस यंत्रणा, पोलिसमित्र आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत होते. यामुळेच गणेशोत्सवातील प्रवास सर्व कोकणवासीयांना सुखकर वाटला. या वर्षी गणेशभक्तांची वाट सुखकर करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीला १५० स्वयंसेवक धावून आले होते. गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी असो वा इतर उद्भविणारे प्रश्न असो; त्यांचे निराकरण करण्यासाठी हे स्वयंसेवक महामार्गावर काम करीत होते.