ऑनलाइन लोकमत/जयंत धुळप
अलिबाग, दि. 18 - रायगडमधील पाली येथे तब्बल 2 कोटी 19 लाख 65 हजार रुपयांच्या नोटा पोलिसांनी सापळा रचून जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोखरक्कमसहीत एकूण 8 जणांना ताब्यातही घेतले आहे.
बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पाली-जांभूळपाडा मार्गावरील खुरावले फाटा येथे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चलनातून बाद झालेल्या 1000 व 500 रुपयांच्या एकूण 2 कोटी 19 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या नोटांसहीत दोन गाड्या व आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.
चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा वटवण्याकरीता एक टोळी पालीमध्ये येणार असल्याची माहिती पालीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण म्हात्रे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार म्हात्रे यांनी स्वतः आपले सहकारी पोलीस निरीक्षक एन.डी.चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ए.चव्हाण, ए.के.म्हात्रे यांनी मोठ्या धाडसाने खुरावले फाटा येथे सापळा रचून ही कारवाई केली असल्याचे पारसकर यांनी सांगितले.
रद्द करण्यात आलेल्या या नोटा घेवून येणारे हे 6 नोकरदार व व्यावसायिक व 2 वाहन चालक आहेत. ते ठाणे व मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात येईल.
स्टेट बँकेचे व्यवस्थापक रणजीतप्रसाद सिंह आणि व्यवस्थापक महेंद्र निकुंभ यांच्या उपस्थितीत दोन मशिनवर तब्बल दोन तास या नोटा मोजून पंचनामा करण्यात आला आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात अन्यत्र नोटा आहेत का? जप्त करण्यात आलेल्या या नोटांचा मुळ मालक कोण? इत्यादी माहिती मिळवण्याच्या दृष्टीने आयकर विभागाच्या सहकार्याने पुढील तपास करण्यात येईल, असे पारसकर यांनी सांगितले.