शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:35 IST2025-01-27T15:34:59+5:302025-01-27T15:35:49+5:30

पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला. 

Raigad Guardian Minister Controversy - Suraj Chavan of Ajit Pawar NCP criticism of Eknath Shinde Shiv Sena minister Bharat Gogavale and MLA | शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

मुंबई - महायुतीचं सरकार येऊन ४-५ महिने झाले, आता पालकमंत्री नियुक्तीनंतर भरतशेठ आणि इतर आमदारांना सुनील तटकरेंनी आमच्याविरोधात काम केले याची जाणीव झाली. निवडणुकीच्या काळात तटकरे जर विरोधात काम करत होते तर त्याचवेळी आवाज उठवायला पाहिजे होता. जाणीवपुर्वक महायुतीत घटक पक्षाला बदनाम करण्यासाठी आता वेळ निवडली आहे. त्यामुळे माझी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे. या 'थ्री इडियट्स'ला आवरा हे लोक दोस्तीत कुस्ती करायला लागलेत अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी हे भाष्य केले.

एका मुलाखतीत सुरज चव्हाण म्हणाले की, हे तिघे महायुतीत बिघाडी करायले लागलेत. त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी त्यांच्या नेतृत्वाकडे मांडाव्यात. महायुतीत जी समन्वय समिती नेमली त्यांच्याकडे मांडावेत. मात्र जाहीररित्या बोलून महायुतीत बिघाडी करण्याचं काम हे तिघे करतायेत. त्यामुळे या लोकांना वेळीच आवर घाला. जर पाडण्याचं षडयंत्र रचलं होते मग निवडणुकीच्या काळात बोलायला हवे होते. पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच या आमदारांच्या बौद्धिक दिवाळखोरीची किव येते. आमचे ३ आमदार आहेत म्हणून पालकमंत्री मिळावे, कोणाला कुठला जिल्हा हा निकष त्यात लावला. कदाचित जो निकष लावला तो या लोकांना माहिती नसेल किंवा यांची बौद्धिक पातळी बघून शिंदेंनी त्यांना पालकमंत्रिपद दिले नसावे असं मला वाटते. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही तरीसुद्धा आमच्याकडे पालकमंत्रिपद आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी या तिघांचा विचार केला पाहिजे. हे लोक तुमच्या निर्णयाला चॅलेंज करतायेत असा दावाही सुरज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, चर्चा करूनच पालकमंत्रिपद दिले गेले. अचानक या निर्णयाला स्थगिती दिल्याचे दु:ख होते. वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घेतले जाईल. ज्या भूमितून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान कसा करायचा याची भूमिका देशाला दिली आज त्याच भूमीत स्त्रीचा अपमान होत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. जो काही तिढा निर्माण झाला तो वरिष्ठ नेते एकत्रित बसून सोडवतील असा विश्वास प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Raigad Guardian Minister Controversy - Suraj Chavan of Ajit Pawar NCP criticism of Eknath Shinde Shiv Sena minister Bharat Gogavale and MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.