नवी दिल्ली – कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत यात ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) ट्विट करून म्हटलंय की, रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरच बरे होतील ही सदिच्छा आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीवर केंद्र लक्ष ठेऊन जास्तीत जास्त मदत पूरग्रस्त भागांना पोहचवण्याचं काम केंद्र करत आहेत असं त्यांनी सांगितले. तसेच दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जे जखमी झालेत त्यांना ५० हजारांची मदत केंद्राकडून देण्यात येईल. सध्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही दुर्घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे.
राज्य सरकारकडूनही मदत जाहीर
राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) दिली आहे. त्याचसोबत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.