Raigad Lok Sabha Result 2024 : देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे. देशासह महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार निवडून आला आहे. अजित पवार गटाने एकूण चार जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे (sunil tatkare) यांनी ठाकरे गटाच्या अनंत गीते (anant geete) यांचा पराभव केला आहे. मतदान केलेल्या एकूण मतदारांपैकी ५०.१७ टक्के लोकांनी सुनील तटकरे यांना पसंती दिली आणि दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चारपैकी केवळ एकच जागेवर विजय मिळवला आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात १३ उमेदवार होते. मात्र या मतदारसंघात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात होती. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने ही लढत तिरंगी झाली होती. रायगडमध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार गट) सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली तर उद्धव गटाच्या शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट दिले होते. रायगड लोकसभा मतदारसंघात हे दोन जुने प्रतिस्पर्धी तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते. मात्र यंदाच्या लढतीत सुनील तटकरे यांनी पुन्हा बाजी मारली आहे.
सुनील तटकरे यांनी ५०८३५२ मते मिळवत अनंत गिते यांचा पराभव केला आहे. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक ८२,७८४ मतांनी जिंकली आहे. तर अनंत गीते यांना ४२५५६८ मते मिळाली आहेत. त्यामुळे सुनील तटकरे हे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या फरकाने निवडूण आले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे सुनील तटकरे यांनी रायगड मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत गीते यांचा ३१,४३८ मतांनी पराभव केला होता. सुनील तटकरे यांना ४,८६,९६८ तर शिवसेनेचे अनंत गीते यांना ४,५५,५३० मते मिळाली होती. व्हीबीएच्या सुमन कोळी २३,१६ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर होत्या. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत रायगडमधून शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले होते.