- डिप्पी वांकाणी, मुंबई
शीना बोरा हत्याकांडाचा तपास सीबीआयने सुरू केल्यापासून रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांभोवतीचा फास आवळत चालला आहे. यातील त्यांच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये पीटर मुखर्जी याची स्वत: चौकशी केली होती. त्याचप्रमाणे त्याची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे डीआयजी लताकुमार मुद्दाम दिल्लीहून येथे आले आहेत. संपूर्ण शनिवारचा दिवस त्यांनी पीटरवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांच्यासोबत एसपी एस.एस. गुरमर आणि डीएसपी के.के. सिंग हेही आहेत.एका ज्येष्ठ सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, रायगडचे तत्कालीन एस.पी. आर.डी. शिंदे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रदीप चव्हाण आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे यांचीही चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसातील एका अधिकाऱ्यावरही नजर आहे.या प्रकरणी रायगड पोलिसांनी केवळ दुर्लक्ष केले की, मृतदेह सापडल्यानंतरही अपघाती मृत्यूची नोंद करण्याचा कोणता हेतू होता काय? या दृष्टीने आम्ही तपास करीत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.याचबरोबर गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांभोवतीचा फासही आवळला जात आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनाही या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. माजी डीजीपी संजीव दयाल यांनी निवृत्तीच्या दिवशी त्यांचा एका पानाचा अहवाल गृहमंत्रालयाला सादर केला आहे; पण तो अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.कटात कुठल्या टप्प्यात पीटर मुखर्जी सामील झाला, याचा तपास सीबीआय करीत असून, त्या दृष्टीने त्यांनी शनिवारी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. या प्रकरणातील घडामोडींची पीटरला सुरुवातीपासूनच माहिती होती, असे पुरावे सांगतात. पीटर सहकार्य करीत असला तरीही त्याची वक्तव्ये विसंगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्वांच्या एकत्रित चौकशीची शक्यताअन्य एका सूत्राने सांगितले की, इंद्राणी, संजीव आणि राय यांची पीटरसोबत एकत्रित चौकशी करण्यास परवानगी सीबीआय न्यायालयाकडे मागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राय यानेच सर्व माहिती उघड केली होती आणि त्याने स्वत: होऊनच न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे जबानी देण्याची तयारी दर्शविली होती. तो आणि पीटर आमनेसामने आल्यास बरीच माहिती मिळू शकेल, असे या सूत्रांनी सांगितले.आपल्या पित्याविरुद्ध लावण्यात आलेले आरोप योग्य वाटत नाहीत, असे पीटरचा मुलगा राहुल याने पत्रकारांना सांगितले. तो म्हणाला की, माझ्या पित्याविरुद्धचे आरोप निव्वळ असत्य असून, त्यात मुळीच तथ्य नाही. पीटरचा भाऊ गौतम आणि त्याची पत्नी यांनीही पीटरची भेट घेतली; पण त्यांनी पत्रकारांना भेटणे टाळले.1 या प्रकरणात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या शाखेची सेवा अद्याप घेण्यात आलेली नाही. मुखर्जीच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करताना कदाचित या शाखेची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.2पीटरला दिल्ली, शिलाँग, गुवाहाटी आणि कोलकाता यांसारख्या ठिकाणी नेऊन त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी त्याला प्रदीर्घ काळाची कोठडी द्यावी, असे प्रयत्न सीबीआय करीत आहे; पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. त्याच्या कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे.3संजीव आणि इंद्राणी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रांच्या प्रती त्यांनी ताब्यात घेतल्या; पण कारचालक श्यामकुमार राय याने या आरोपपत्राची प्रत त्याच्या वकिलांना दिली नाही. त्याऐवजी त्याने कारागृहात ही प्रत सोबत ठेवण्याचा आग्रह धरला आहे.