कामशेत : सह्याद्री प्रतिष्ठानच्या दोन सदस्यांनी केली अडीच दिवसात किल्ले रायगडाची आगळी वेगळी साहसी दुर्ग भ्रमंती. यात किल्ले रायगड प्रदक्षिणा कमीत कमी वेळात (साडेतीन तास) पूर्ण केली. गडावरील भवानी कडा, वाघ दरवाजा ही दोन्ही ठिकाणे कमी वेळात किल्यावरून उतरून परत चढले. या सदस्यांनी नवीन विक्रम नोंदविला.सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शनासाठी कार्यरत असून संस्थेच्या वर्षभर दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन मोहिमा सुरू असतात. या संस्थेतील दोन सदस्य गणेश दत्ताराम रघुवीर (मुंबई) व दादासो उद्गुडे पाटील (पुणे) यांनी दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगडला एक आगळी वेगळी साहसी भेट दिली. या भेटीपूर्वी भ्रमंती विषयी यथोचित माहिती मिळवून त्याचा अभ्यास करून अत्यावश्यक वस्तू व माहिती आदी गोष्टी सोबत घेऊन त्यांनी भ्रमंती केली.रघुवीर आणि पाटील यांनी रविवारी सकाळी सुरुवात केली. ७ वाजता चित्त दरवाज्याच्या पायथ्याशी पोहोचून रायगडवाडी येथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली. रायगडवाडीतून ९ वाजून २० मिनिटाला प्रदक्षिणेस सुरुवात केली. वाटेत रायनाक स्मारक लागले तेथून घनदाट जंगलाची पायवाट तुडवीत पक्ष्यांचा आवाज ऐकत प्रसन्न वातावरणात बघता बघता टकमक वाडी वाटेत आली. पुढील दमछाक करणारी वाळूसरे खिंड ओलांडून ते सातबारानीच खळगा करून काळकाई खिंडीकडे गेले. तेथे वाघ दरवजा डोकावत होता. १० मिनिटांची विश्रांती घेत काळकाई खिंड, पोटल्याचा डोंगर असे करत एका अनामिक समाधीकडे पोहोचले. तेथून रस्ता लागला व हिरकणी वाडीत पोहोचले. तेथून चित्त दरवाजा गाठला. दोन लहान ब्रेक घेऊन अतिशय वेगवान गतीने म्हणजे ३ तास ३८ मिनिटे ४८ सेकंदात प्रदक्षिणा पूर्ण केली आणि दोघांनी चित्त दरवाजा व किल्ले रायगडला नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घातले.प्रदक्षिणेदरम्यान रायगडचे विशाल रूप दिसले. टकमक टोक, भवानी कडा, वाघ दरवाजा, हिरकणी बुरुज आदींनी दोघांना खिळवून टाकले. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर जेवण करून त्यांनी रायगड चढण्यास सुरुवात केली. या वेळी नाणे दरवाजाने चढण्यास सुरुवात केली. दादासाहेब याने गेल्या वर्षभरात किल्ल्याच्या अनेक ठिकाणांची पाहणी करून ठेवली होती. नाणे दरवाज्याची बांधणी तटबंदी बुरुज याची पाहणी करून मदारी मोर्चाकडून अंधारी कोठडीकडे गेले. तेथून पाण्याची टाके पाहून साधारण ४५ कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी सरळ महादरवाजाकडे दोघे निघाले. तेथून टकमक टोकाकडे जाणाऱ्या तटबंदी व बुरुजादरम्यान ६ तोफा चिलखती बुरुज व त्याच्या आतमध्ये लहान दरवाजे आहेत. घळीतून वर गेल्यावर एक नैसर्गिक गुहा लागते. ती पाहून टकमक टोकाकडील दारू कोठारे पाहून बाजार पेठेत दोघे बाहेर पडले. रायगडाची ही आडवळणाची वाट आहे. बाजार पेठेजवळील पाड्यात मुक्कामाची व्यवस्था केली व ४ वाजता वाघ दरवाज्याकडे दोघे निघाले.काही ऐतिहासिक ठिकाणे, नाणे दरवाजा, अंधार कोठडी, महादरवाजावरील तटबंदी व त्यावरील तोफा तटबंदीमधील दरवाजे, टकमक टोका खालील गुहा, दारू कोठारे, जगदीश्वर मंदिराखालील डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्या, समाधीपासून भवानी टोकापर्यंतच्या उजव्या व डाव्या बाजूला घळीत असणाऱ्या पाण्याच्या टाक्या व पहाऱ्याच्या चौक्या, समाधी बंधारे, भुयार अशा अनेक वस्तूंची पाहणी या भ्रमंतीत झाली.भवानी कडा ७०० फूट उंचीची आहे. रायगडाच्या भवानीकड्यावरून प्रतापगड दिसतो म्हणून या कड्यास भवानी कडा हे नाव दिले असावे. अतिशय अवघड अशी वाट खाली मातीचा उभा घसारा आहे. असे करत ४२ मिनिटांत आम्ही भवानी कडा खालील सोंडेवर दोघे पोहोचले. तेथे जास्त वेळ न घालवता त्यांनी परत भवानी कडा चढायला सुरुवात केली. २२ मिनिटांत ते भवानी कड्याजवळ पोहोचले. भवानी मातेचे दर्शन घेतले आणि रॅपलिंग, क्लायमिंगद्वारे भवानी कडा उतरण्याचा आणि चढण्याचा आंनद व्यक्त केला. (वार्ताहर)उभ्या कातळावर क्लायम्ब्ािंगवाघ दरवाजा काळकाई खिंडीतून ५५० ते ६०० फूट उंचावर आहे. या दरवाजाला उभ्या कातळात कोरलेल्या मोजून लहान ५ पायऱ्या असून इतर कुठेही पायऱ्या नाहीत. या पूर्वी अवघड किल्ल्यावर गिर्यारोहण केल्याने तांत्रिक माहिती व कसब दोघांकडे होते. त्यांनी उतरायला सुरुवात केली. अवघड ठिकाणी पाय रोवून चिमणी क्लिंब करत हळूहळू खाली उतरले. उतरण्यास २५.३६ मिनिटे लागली. खाली आल्यावर काळकाई खिंडीचे दर्शन घेऊन खालून पुन्हा वाघ दरवाजा न्याहाळला. परत उभा खडकात असणारा हा भयंकर दरवाजा चढायला सुरवात केली. बरोबर २१व्या मिनिटाला ते दरवाजावळ पोहचले. वाघ दरवाजाला नतमस्तक होत त्यांची पावले महाराजांच्या सिंहासनाकडे वळली. सिंहासनासमोेर साष्टांग दंडवत करून ते मुक्कामाच्या ठिकाणी निघाले.
साडेतीन तासांत रायगड प्रदक्षिणेचा थरार
By admin | Published: April 04, 2017 1:50 AM