मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि योगदानाबद्दल ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर (२०१३), ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (२०१२) आणि ल. त्र्यं. जोशी (२०११) यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार देऊन राज्य शासनाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीन वर्षांतील या तीन पुरस्कारांचा वितरण समारंभ ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. ‘लोकमत’चे समूह संपादक असलेले दिनकर रायकर यांना पत्रकारितेचा सुमारे ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. इंडियन एक्स्प्रेसचे वार्ताहर ते मुंबई आवृत्तीचे संपादक तसेच लोकमत आणि लोकमत टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. पत्रकारितेतील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. कुवळेकर यांना ३३ वर्षांच्या पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असून लोकमत, सकाळचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. लक्ष्मणराव जोशी हे नागपूरच्या लोकशाही वार्ताचे संपादक असून ४५ वर्षांहून अधिक काळ ते पत्रकारितेत आहेत. तरुण भारतचे संपादक म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली. गोमंतक, गोवादूतचेही ते संपादक होते. राज्य शासनाच्या वतीने विविध गटांत देण्यात येणाऱ्या गेल्या तीन वर्षांतील पत्रकारिता पुरस्कारांची घोषणाही आज झाली. २०११ मधील अन्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये शेख रिजवान,खलिल, इरशाद बागवान, नागेश दाचेवार, भिकाजी चेचर, चारु शीला कुलकर्णी, रवी गाडेकर, अमिता बडे, गणेश कोरे, जान्हवी सराटे यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)> पुरस्कारांवर लोकमतची छापविविध गटांतील पत्रकारिता पुरस्कारांवर लोकमतने मोहोर उमटविली. लोकमत समाचार; जळगावचे मुकेश शर्मा यांना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (४१ हजार), लोकमतचे रत्नागिरी तालुका प्रतिनिधी शिवाजी नामदेव गोरे यांना शि.म.परांजपे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; अकोलाचे वरिष्ठ उपसंपादक नरेंद्र बेलसरे यांना लोकनायक बापुजी अणे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे उपसंपादक मिलिंद कीर्ती यांना ग.त्र्य.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार), लोकमत; मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांना आचार्य अत्रे पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर बोबडे यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार), लोकमत; नागपूरचे उपसंपादक चंद्रशेखर गिरडकर यांना ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (४१ हजार) आणि लोकमत; साताराचे वार्ताहर मोहन मस्कर-पाटील (४१ हजार) हे मानकरी ठरले.
रायकर, कुवळेकर, जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: January 29, 2015 6:01 AM