ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.20 - रेल्वेच्या डब्यात झुरळांचा वावर असल्यामुळे प्रवाशाला प्रवासादरम्यान मानसिक त्रास झाला. तक्रारकर्त्याने मौखिक आणि लेखी तक्रार केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, असा ठपका ठेवत अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूरने मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि दक्षिण-मध्य रेल्वे, चेन्नईचे महाव्यवस्थापक यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम वैयक्तिक अथवा संयुक्तिक स्वरूपात एक महिन्याच्या आत भरायची आहे. तक्रारकर्ते जे. राधाक्रिष्णन जयराम (५७) आणि ललिता राधाक्रिष्णन (५४) रा. शंकरनगर यांनी रेल्वेच्या राखीव कोचमधून प्रवास करताना झुरळांमुळे झालेल्या त्रासामुळे नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-१९९६ चे कलम-१२ खाली मंचाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्ते व त्यांची पत्नी हे तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये एसी-२ टायरने चेन्नई ते नागपूर असा प्रवास २७ सप्टेंबर २०१२ ला कोच क्र. ए-३ मध्ये बर्थ क्र. ४ व ५ वर करीत होते. प्रवासादरम्यान त्यांना डब्यात झुरळ वावरत असल्याचे दिसले. झुरळांमुळे त्यांना व डब्यातील इतर प्रवाशांना बराच त्रास झाला व ते नीट झोपू शकले नाही. प्रवासादरम्यान त्यांनी प्रत्येक स्थानकावर रेल्वेतील कर्मचाऱ्यांकडे याबद्दल तक्रारी केल्या व एक लेखी तक्रार तक्रारपेटीत टाकली. परंतु रेल्वेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने त्यावर काहीही कारवाई केली नाही. ही रेल्वेच्या सेवेतील कमतरता होती. तक्रारीवर सुनावणी करताना मंचचे अध्यक्ष शेखर मुळे आणि सदस्य नितीन घरडे यांनी उपरोक्त आदेश दिले.
झुरळामुळे रेल्वेला १५ हजारांचा दंड
By admin | Published: July 20, 2016 9:50 PM