मुंबई : कौशल्याआधारीत शिक्षण आणि नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. विद्यापीठात लवकरच रेल इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी सेंटर उभे राहणार आहे. कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई विद्यापीठाशी सामंजस्य करार केला असून सोमवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत या कराराला मान्यता देण्यात आली. हे अभ्यासक्रम कलिना, कल्याण आणि रत्नागिरी याठिकाणी येत्या काही वर्षांत सुरु करण्यात येणार आहेत.भारतीय रेल्वेच्या व्हिजन २०२० उपक्रमाअंतर्गत कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षणक्रम व संशोधनाला चालना मिळण्यासाठी भारतीय रेल्वेने उच्च शिक्षणात रेल्वेशी निगडीत तंत्रज्ञान विकसीत करण्यावर भर दिला आहे. या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी शैक्षणिक सहकार्य करत सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच मुंबई विद्यापीठात रेल इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. तर ग्रूप सी मधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि त्यांच्या क्षेत्रात कौशल्यवाढीला वाव मिळावा यासाठी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.परदेशात रेल्वेला कुशल मनुष्यबळ पुरविणाऱ्या विशेष संस्था आहेत. त्याच धर्तीवर भारतीय रेल्वेने हे महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या अभ्यासक्रमास रेल्वेने अर्थसंकल्पात १४२.८९ कोटींची तरतूद केली आहे. २०१५-१६ या वर्षात २५ कोटींची तरतूद रेल्वेने प्रस्तावित केली आहे. ज्यामध्ये पायाभूत सुविधा ८ कोटी, प्रयोगशाळा व साहित्य ८ कोटी, मानव संसाधन ३.५० कोटी, अनुदान ०.२५ कोटी, प्रवास खर्च ०.२५ कोटी, प्रकल्प निधी ५ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठात रेल इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी सेंटर
By admin | Published: February 24, 2015 4:19 AM