डोंबिवली : खडवली-वासिंद स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.४० च्या सुमारास घडली. यामुळे आसनगाव-कसारा मार्गावरील लोकल पाऊण तास खोळंबल्या. एक लांब पल्ल्याची गाडी आणि कसाऱ्याकडे जाणारी एक लोकल अडकल्याने त्यातील प्रवासी ताटकळले.थंडीच्या दिवसांमध्ये रुळांना तडा जाण्याच्या घटना आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मागील आठवड्यात विठ्ठलवाडीनजीक लोकलचे डबे रुळांवरून घसरले होते. त्यापाठोपाठ शुक्रवारी वासिंद स्थानकादरम्यान रुळाला तडा गेला. कसारा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्याचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीलाही बसला. परिणामी कसारा, खर्डीसह आसनगाव, खडवली आदी स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती.या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी तत्काळ ट्रॅक दुरुस्त केला. सकाळी ८.१३ च्या सुमारास वाहतूक सुरू झाल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस व आसनगाव स्थानकातील प्रवासी जितेंद्र विशे यांनी दिली. रेल्वेच्या तांत्रिक घोळाचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक बसतो. हिवाळा व पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दोषांमुळे सेवा बाधित होते. त्यासाठी प्रभावी उपाययोजना का केली जात नाही, असा सवाल विशे यांनी केला. (प्रतिनिधी)
खडवली-वासिंद मार्गावर रेल्वे रुळाला तडा
By admin | Published: January 07, 2017 3:59 AM