सुशांत मोरे, मुंबईस्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकलची पत्रकारांना घेऊन चाचणी करण्यात आली आणि रविवारपासून ही लोकल सेवेत दाखल झाली. महत्त्वाची बाब म्हणजे या लोकलच्या चाचणीपासून तेही लोकल सेवेत दाखल झाल्यावरही त्याची रेल्वे सुरक्षा आयुक्तांना माहितीच देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. मुळात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने त्याची लेखी माहिती आयुक्तांना देणे आवश्यक होते. परंतु लोकल सुरू करीत असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली नसल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतक बक्षी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शुक्रवारी स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकलची पत्रकारांना सोबत घेऊन चर्चगेट ते बोरीवली अशी चाचणी करण्यात आली. यावेळी सोबत रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद होते. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रविवारपासून ती सेवेत आणत असल्याची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर ती नियमितपणे सुरूही झाली. स्वयंचलित दरवाजा हा सध्या एका लोकलच्या फक्त एका फर्स्ट क्लास महिला डब्यालाच बसविण्यात आला आहे. साधारपणे एका महिन्याच्या निरीक्षणानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येकी चार लोकलच्या डब्यांना टप्प्याटप्प्यात स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मात्र या लोकलची चाचणी करण्यापूर्वी किंवा ती सेवेत दाखल होण्यापूर्वी त्याची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी होणे आवश्यक होते. उपनगरीय लोकल सेवेतून कामाच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही लक्षणीय असते. अशावेळी स्वयंचलित दरवाजा किती काम करेल किंवा प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण तर करणार नाहीना, असे अनेक प्रश्न उपस्थित होणे आवश्यक होते आणि त्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी होणे महत्वाचे होते. मात्र आयुक्तांना कुठलीही कल्पना न देता लोकलची चाचणी करण्यात आली .
चाचणीबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त अनभिज्ञ !
By admin | Published: March 16, 2015 3:23 AM