नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेची अर्थसंकल्पापूर्वीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी नांदेड येथे पार पडली. मात्र, या बैठकीतून मराठवाड्याच्याच पदरी फारसे काही पडले नाही. रेल्वेच्या मराठवाड्यातील प्रश्नासंदर्भात प्रशासन उदासिन असल्याचा आरोप खा. अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत रेल्वेमंत्री पियुश गोयल यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.चव्हाण यांच्या बरोबरच खा. राजीव सातव यांनीही नाराजी व्यक्त केली. नांदेड-पुणे मार्गावर यात्रेकरुंच्या सोयीनुसार गाडी चालवावी.याबरोबरच नांदेड-नागपूर आणि नांदेड-मुंबई या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता नव्या गाड्या सुरू कराव्यात, या मागणीबाबत रेल्वे प्रशासन उदासिन आहे. नांदेड-लातूर प्रवासासाठी सध्या अवांतर वेळ जातो. तो वाचविण्यासाठी १०३ कि.मी.च्या नव्या नांदेड-लातूर रेल्वे मार्गाची आवश्यकता असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.नांदेड रेल्वे विभाग दक्षिण मध्य रेल्वे ऐवजी मध्य रेल्वेशी जोडावा, ही मागणी मागील दशकाभरापासून मराठवाड्यातील खासदार करीत आहेत.मराठवाड्यातील प्रवाशांची देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी आहे. याबरोबरच उन्हाळी सुट्यांच्या काळात या मार्गावरुन विशेष गाड्या सोडण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तिरुपती-निजामाबाद व रेल्वे गाडी नांदेडपर्यंत आणावी. तसेच नांदेड हुजूर साहिब स्टेशनवरील ओव्हर ब्रीज लहान असल्याने त्याचे रुंदीकरण करावे, आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या.खा. राजीव सातव यांनी रेल्वे प्रशासन मराठवाड्याच्या मागणीकडे कानाडोळा करीत असल्याचाआरोप करीत मनमाड-मुंबई चालणारी राजा-राणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली.या खासदारांची बैठकीकडे पाठरेल्वे अर्थसंकल्पापूर्वीच्या या महत्वाच्या बैठकीला १२ खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र खा. रावसाहेब दाणवे (जालना), आनंदराव अडसुळ (अमरावती), हरिषचंद्र चव्हाण (दिंडोरी), नंदकुमारसिंह चव्हाण (खांडवा), भावना गवळी (यवतमाळ) आणि राज्य सभेचे खा. राजकुमार धुत बैठकीला अनुपस्थित होते.
मराठवाड्याच्या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासन उदासीन - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:05 AM