कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट ‘लेटरहेड’ तयार करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली शिवाजीनगर येथील योगेश मनोहर हेरेकर (३२) याला मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली.योगेश हेरेकर हा भारतीय रेल्वेचे अधिकृत खासगी प्रवासी आरक्षण केंद्र चालवितो. त्याने कणकवलीतील एका वकिलाला मुंबई-कणकवलीचे रेल्वे तिकीट मिळवून दिले होते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून योगेश हेरेकर याने अनेकांना तिकीट मिळवून दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून नेहमीच कणकवलीतून तिकीट बुकिंग होत असल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाºयांच्या लक्षात आले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून योगेश हेरेकर याला ‘लेटरहेड’ दिले आहे का, याची विचारणा केली. त्यांच्याकडून नकारार्थी उत्तर आले. त्यानंतर, कोकण रेल्वे अधिकाºयांनी मुंबई गुन्हा अन्वेषणशी संपर्क साधून तक्रार दिली. नंतर पथकाने हेरेकर याच्या कणकवली रेल्वे स्टेशन रोडवरील कार्यालयावर छापा टाकून मुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेडचे गठ्ठे जप्त केले. इतर कामातही तो मुख्यमंत्र्यांचे ‘लेटरहेड’ वापरून शासनाची फसवणूक करत असल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट ‘लेटरहेड’द्वारे रेल्वेचे बुकिंग, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 3:02 AM