ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 11 : रेल्वेचा नांदेड विभाग मुंबईस्थित मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीला कायम बगल दिल्याने रेल्वे मंत्रालयाच्या दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर सिकंदराबादशी जोडल्याची खंत व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी नागपूर व पुणे रेल्वेच्या वेळापत्रकातील गडबडीचाही मुद्दा मांडला. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नांदेड येथे मराठवाड्यातील खासदारांची बैठक होत आहे. या संदर्भाने माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, नांदेड रेल्वे विभाग भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व भावनिकदृष्ट्या मुंबईस्थित मध्य विभागाशी जोडलेला आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य मधील नांदेड विभागाला मध्य विभागाशी जोडावे, ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्याकडे दूर्लक्ष होत आहे. तसेच पुणे व नागपूरला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक खाजगी ट्रॅव्हल्स चालकांच्या सोयीचे आहे. एकीकडे प्रवाशांच्या गैरसोयीचे वेळापत्रक बनवायचे. दुसरीकडे प्रवासी नाहीत म्हणून रेल्वे बंद करायची, असा अर्थपूर्ण डाव खेळला जातो. यामध्ये रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी व खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे हितसंबंध गुंतले असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी आपली मागणी आहे. दरम्यान, खासदारांच्या बैठकीत कोणत्या मागण्या महत्वाच्या राहतील, असे विचारले असता ते म्हणाले, मराठवाड्यातील रेल्वे विस्तार व विकास मंदगतीने सुरू आहे. परभणी-मनमाड, मुदखेड-बोलाराम, मुदखेड-अदिलाबाद, पूर्णा-खांडवा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. अकोला-खांडवा रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी आहे. पूर्णा येथे डिझेल लोकोशेडची निर्मिती केली पाहिजे. तसेच बोधन-बिलोली-मुखेड-लातूर व नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर या दोन नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. मराठवाड्यातील प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी कोणते बदल अपेक्षित आहेत यावर खा. चव्हाण म्हणाले, मुंबई व नागपूरसाठी रात्रीच्या वेळी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करावी. नांदेड-पुणे व नांदेड-पनवेल या दोन्ही रेल्वे लातूरमार्गे धावतात. त्यांना पुण्याला पोहचण्यासाठी १३ तास लागतात. याच रेल्वे मनमाडमार्गे धावल्या तर १२ तासात पुण्याला पोहचता येईल. सोबतच नांदेड-परभणी-जालना-औरंगाबाद- मनमाड जाणे सोयीचे होईल. नांदेड येथून नागपूरला जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबादमार्गे जाते. ही गाडी १२ तास वेळ घेते. त्याऐवजी पूर्णा-अकोला मार्गे सोडावी. विशेष म्हणजे नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबाद ते वरोरा या ११० कि.मी. अंतरासाठी पाच तास वेळ घेते. ही गती वाढवली तर नागपूरला नंदीग्राम वेळेवर पोहचेल. नांदेड-पुणे रेल्वेला दहा डब्बे आहेत. ती संख्या वाढवली पाहिजे. उन्हाळी सुट्यांमध्ये विशेष गाड्या सुरू कराव्यात. उमरी-धर्माबाद येथे लांबपल्ल्याच्या धावणाऱ्या औरंगाबाद- तिरुपती, अमरावती-तिरुपती, अकोला-तिरुपती, संबलपूर एक्स्प्रेस, नगरसोल एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा अशीही आपली मागणी आहे.रेल्वे विकास व विस्तारीकरणाबद्दल खा. चव्हाण म्हणाले, नांदेड-वर्धा-यवतमाळ हा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या नवीन मार्गास २००८-०९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. परंतु निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळलेला असून त्यासाठी अधिकचा निधी द्यावा, अशी मागणी आहे. मराठवाड्यातील धर्माबाद, उमरी, किनवट, ब्राह्मणवाडा, भेंडेगाव, पाथरड येथे रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती तात्काळ करावी. नांदेड स्थानकावरील फ्लाट क्रमांक ४ ची लांबी वाढवावी, दोन नवीन लिफ्ट व दोन सरकते जिने बसवावेत, अशीही आपली मागणी असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
रेल्वे दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 8:49 PM