मुंबई : रेल्वे ई-तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नुकतेच देण्यात आले. त्या आदेशानुसार मुंबईत रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कारवाई केली जात आहे. ई-तिकिटांची विक्री पानाची टपरी, ट्रॅव्हल्स शॉप आणि मोबाईल शॉपमधून सर्रासपणे होत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईतील काही ठिकाणी मंगळवारी छापे टाकत तब्बल ११ लाख ७३ हजार २३४ रुपयांची ३२५ ई-तिकिटे वेगवेगळ्या ठिकाणांहून हस्तगत केली. रेल्वे पोलिसांची एकाच दिवसांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. दहा दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिम डॉ. दळवी रोड येथील राम टी-हाउसमधून रेल्वेच्या ई-तिकिटांची अनधिकृतरीत्या तिकीट विक्री होत असल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, धाड टाकत ४ हजार १२३ रुपयांचे एक ई-तिकीट जप्त केले आणि पुढील चौकशीनंतर आरोपीच्या सहकाऱ्यांची माहिती घेत आणखी २१ ई-तिकिटे जप्त केली होती. रेल्वे सुरक्षा दलाकडून ही कारवाई अद्यापही सुरूच असून, रेल्वेमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेशच दिले आहेत. त्यानुसार, धडक मोहीम मुंबईतील अनेक ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाने हाती घेतली आहे. मंगळवारी (१९ जुलै) जोगेश्वरी पश्चिम अनंत नगर येथील मलिक ट्रॅव्हल्स शॉप नंबर दोनवर धाड टाकत ६५ हजार ५४४ रुपये किमतीची २८ ई-तिकिटे हस्तगत केली. ही तिकिटे विकताना १५0 ते ३00 रुपये एवढ्या जादा किमतीने विकण्यात येणार होती, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. त्यानंतर जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग येथील यश मोबाइल अॅण्ड ट्रॅव्हल्स येथे धाड टाकत १८ हजार ३0३ रुपये किमतीची १४ तिकिटे हस्तगत केली. ही तिकिटेही १00 ते २00 रुपये जादा दराने विकण्यात येणार होती. त्यानंतर कांदिवली पश्चिम चारकोप ओमकार सोसायटीत असलेल्या एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात ई-तिकिटांची विक्री होणार असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यात टाकलेल्या धाडीत १0 लाख ८९ हजार ३८७ रुपये किमतीची तब्बल २८३ ई-तिकिटे हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>पर्सनल आयडीवरून केली विक्रीई-तिकिटांची विक्री ही पर्सनल आयडीवरून करण्यात येत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. या धाडीत काही वापरून झालेली तिकिटेही हस्तगत करण्यात आली आहेत. यात ४७ हजार ९३ रुपये किमतीच्या २१ आणि ३३ हजार ६४९ रुपये किमतीच्या २४ तिकिटांचाही समावेश आहे. ई-तिकिटांच्या अनधिकृत विक्रीला आळा बसवण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक ठिकाणांहून ई-तिकिटे जप्त केली जात आहेत. ही मोहीम यापुढेही सुरुच राहिल.- आनंद झा (पश्चिम रेल्वे सुरक्षा दल-वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)
पान टपरीवर रेल्वे ई-तिकीट
By admin | Published: July 21, 2016 5:28 AM