लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, तिकीट बुकिंग एजंटपुढे रेल्वे प्रशासन हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. आगामी गणेशोत्सव काळातील ट्रेनचे बुकिंग अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झाल्याने प्रवासी हतबल झाले आहेत. शिवाय वेटिंग लिस्टही ४०० पर्यंत पोहोचल्याने मनस्तापात आणखीच भर पडली आहे. परिणामी, कोकण रेल्वे प्रवासी सध्या विशेष गाड्यांच्या प्रतीक्षेत आहेत.गणेशोत्सव काळातील ट्रेनच्या आरक्षणासाठी नुकतीच सुरुवात झाली आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी कोकणाकडे मोठ्या संख्येने जातो. याचा फायदा घेत एजंट तिकीट बुक करतात. परिणामी, कोकण कन्या, मांडवी, राज्यराणी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत, शिवाय ट्रेनची वेटिंग लिस्ट ही ४०० पर्यंत पोहोचली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास वेटिंग लिस्टही बंद होण्याची शक्यता आहे, तर गणेशोत्सव काळातील ट्रेनची बुकिंग नियमांनुसारच होत असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणणे आहे.‘विशेष ट्रेन’वर अवलंबून सीएसटी ते कल्याण-कर्जत आणि चर्चगेट ते बोरीवल पट्ट्यात कोकणातील रहिवासी वास्तव्य करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि खिशाला परवडणारा असल्यामुळे, चाकरमानी रस्ते वाहतुकीपेक्षा कोकण रेल्वेला प्राधान्य देतात. कोकणात जाणाऱ्या ट्रेन सद्यस्थितीत फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांना कोकण रेल्वेच्या गणपती विशेष ट्रेनवर अवलंबून राहावे लागणार आहे.
गणेशोत्सवासाठी रेल्वे फुल्ल
By admin | Published: May 11, 2017 3:11 AM