मुंबई, दि. 29 - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती. मात्र त्याचे टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक हरिश प्रभू यांनी मुंबईतून ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याआधीच पुलाच्या बांधकामास परवानगी दिली होती, मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्याचे टेंडर निघू शकले नाही, अशी नवी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 23 एप्रिल 2015 रोजी एलफिस्टन येथे 12 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब इतक्या आकाराचा पूल बांधण्यास मंजुरी दिली होती. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या संदर्भातला पत्रव्यवहार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत केला होता.एलफिस्टन येथील पादचा-यांच्या समस्या लक्षात घेऊन हा रेल्वे ब्रिज वाढवण्याची आवश्यकता आहे, याकडे लक्ष्य वेधले असता त्यावेळी सुरेश प्रभूंनी बांधकामासाठी मंजुरी दिली होती. या पुलाच्या बांधकामासाठी 11.86 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले. मात्र त्यानंतर ही मंजुरी सरकारी लालफितीत अडकली. रेल्वे प्रशासनाने या फाईलकडे वा रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीकडे कानाडोळा केल्यानं या पुलाचे टेंडर निघाले नाही. रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जबाबदार असल्याचीच माहिती सुरेश प्रभू यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जर तेव्हाच या मंजूर फाईलवर त्वरित कारवाई करण्यात आली असती आणि या पुलाचे कंत्राट काढण्यात आलं असत तर आज मुंबईमध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती आणि विनाकारण 22 माणसांचा मृत्यू झाला नसता. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे या दुर्घटनेत 22 जणांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. तर 39 जण जखमी झालेत. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर एका व्यक्तिच्या सांगण्यानुसार प्रचंड गर्दीच्यावेळी एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली होती.