ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - पायातील चप्पल काढून एअर इंडियाच्या कर्मचा-याला बेदम मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी नो फ्लाय यादीत टाकले आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्या त्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्यांना विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. भारतातील सर्वच विमान कंपन्यांनी विमानप्रवास करण्याची बंदी घातल्यामुळे रविंद्र गायकवाड यांना प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये रेल्वेचा समावेश आहे. मात्र रेल्वेला लागणारा वेळ पाहता हा निर्णय घेणं तस त्यांच्यासाठी कठीण आहे.
विमान कंपन्यानी गायकवाड यांच्यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला असून त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे गायकवाड यांना दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचा सहारा घ्यावा लागणार. रेल्वेशिवाय ते स्वत:च्या चार्टेट हेलिकॉप्टर किंवा गाडीने प्रवास करु शकतात.
मुख्य म्हणजे दिल्लीत अधिवेशनादरम्यान अनेकदा खासदार शुक्रवारी आपल्या घरी जाणं पसंद करतात, आणि सोमवारी पुन्हा संसदेत हजेरी लावतात. अशावेळी प्रवासात कमीत कमी वेळ खर्च व्हावा अशी अपेक्षा असते. अशा परिस्थितीत रवींद्र गायकवाड रेल्वेने प्रवास करतील की नाही याबाबत थोडी शंकाच आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर रवीद्र गायकवाड रेल्वेने प्रवास करत असल्याने रेल्वे अधिका-यांनो सावधान राहा असे मेसेज फिरत आहेत.झालेल्या सर्वच प्रकरणावर रविंद्र गायकवाड यांनी साधी खंतही व्यक्त केली नाही. उलट आपण त्याला सँडलने २५ वेळा मारले, असे स्वत: सांगितले. उस्मानाबादाचे खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा आणि एअर इंडियाचे विमान तब्बल ४0 मिनिटे रोखून धरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र गायकवाड यांच्या या कृत्याचं समर्थन करणार नाही, मात्र त्यांच्यावर ही वेळ का आली याचा तपास व्हावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, यामध्ये त्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे.