वसई : रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण व धक्काबुक्की केल्याच्या घटना नालासोपारा व वसई रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री घडल्या. नालासोपारा रेल्वे स्थानकावर झालेल्या घटनेत पोलीस हवालदार सूर्यकांत येळे (४९) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनवर हवालदार येळे मंगळवारी रात्री गस्त घालत होते. दीडच्या सुमारास पादचारी पुलावर दोन इसम दारू पिऊन धिंंगाणा घालत होते. येळे यांनी त्या दोघांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी येळे यांनाच बेदम मारहाण केली. मारहाणीत येळे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येळे यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.येळे यांना मारहाण करणाऱ्या सांताक्रुझ येथील राजेश देवघडी राय (३२) आणि सलीम शेख (४७) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा आरोपी पसार झाला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. वसई येथे रेल्वे पोलीस रोहिदास मगर यांना दारुड्याने धक्काबुक्की केल्याची घटना घडली. मुंबई सेंट्रल जीआरपीचे हवालदार असलेले मगर महिलांच्या डब्यात रात्री गस्तीला होते. गाडी वसई रेल्वे स्टेशनात थांबली असताना, दारूच्या नशेत असलेला राकेश कनथ (३०, रा. नालासोपारा) महिलांच्या डब्यात चढला. मगर यांनी त्याला डब्यातून उतरण्यास सांंगितले. कनथने मगर यांच्याश्ी वाद घालत त्यांनाच धक्काबुक्की केली. राकेश डब्यातून उतरण्यास तयार नसल्याने, मगर यांनी त्याला विरार पोलीस चौकीत आणले. तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
रेल्वे पोलिसाला मारहाण, धक्काबुक्की
By admin | Published: February 16, 2017 4:45 AM