मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गांवर लोखंडी वस्तू तसेच स्फोटके सापडल्यानंतर घातपाताची शक्यता रेल्वे पोलिसांकडून वर्तविण्यात आली. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी मुंबईतील मुख्यालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम् तसेच शहर पोलीस, अन्य राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे हद्दीत होणारे घातपाताचे प्रकार लक्षात घेता तपासकामात अन्य राज्यातील एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) संपर्कात राहण्याच्या सूचना या वेळी सतीश माथुर यांनी उपस्थित पोलिसांना केल्या. तपास करताना रेल्वे पोलिसांनी अन्य राज्यातील पोलिसांशी संपर्कात राहून चर्चा करावी आणि सूचनांची देवाणघेवाणही करावी. जेणेकरून गुन्हेगार पकडण्यास मदत होईल. बैठकीत सुरक्षेबरोबरच गुन्हेगारी, पायाभुत सुविधा, प्रशासकीय कामे याबाबतही चर्चा करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने अनधिकृत गेट्स, रेल्वेचे कंत्राटदार कामगार यांची संपूर्ण माहिती घेणे, रेल्वे पूल, बोगदे यांची पाहणी करतानाच रुळांवर गस्त घालावी; त्याचप्रमाणे रुळांजवळ असलेले लोखंडी तुकडे व अन्य वस्तू हटविण्यात याव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या. रेल्वेत मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यात रूळ ओलांडताना होणाऱ्या प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. हे अपघात रोखण्यासाठी सामाजिक संस्थाच्या साहाय्याने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने आणि रेल्वे सुरक्षा दलाने जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्याची सूचनाही केली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे पोलीस राहणार आंतरराज्य ‘एटीएस’च्या संपर्कात
By admin | Published: March 04, 2017 2:06 AM