मिरज / आदर्की : सातारा जिल्ह्यातील वाठार ते आदर्कीदरम्यान मालगाडीचे चार डबे बुधवारी दुपारी घसरल्याने मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तर, म्हैसूर अजमेर, कुर्ला-हुबळी एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, गोवा-निजामुद्दीन व महालक्ष्मी एक्स्प्रेस कुर्डुवाडीमार्गे वळविण्यात आल्या.उगार येथून मुंबईतील घोडबंदर येथे ४३ बोगीतून साखर घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे अखेरचे चार डबे व गार्ड डबा दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास वाठार ते आदर्की स्थानकादरम्यान रुळावरून घसरले. मालगाडीतील मिरजेचे गार्ड सुरेश कुंभार किरकोळ जखमी झाले.रेल्वे अपघातामुळे कोल्हापूरकडे येणारी कोयना एक्स्प्रेस लोणंद येथे थांबवून पुणे स्थानकाकडे परत पाठविण्यात आली. म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस, कुर्ला-हुबळी एक्स्प्रेस, निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस दौंड, कुर्डुवाडीमार्गे वळविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.दोन आठवड्यांपूर्वी आदर्की येथे वळणावर मालगाडीचे डबे घसरले होते. त्याच ठिकाणी पुन्हा बुधवारी डबे घसरून अपघातात रेल्वेमार्ग उखडला गेला. उद्ध्वस्त झालेला रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.