ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १४ - नांदेडचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी रेल्वेमध्ये साईड बर्थ नाही मिळाला म्हणून सीएसटी स्टेशनवर गोंधळ घातला. या गोंधळामुळे सिकंदराबाद-देवगिरी एक्सप्रेस तब्बल एक तास रखडून राहिल्याचा आरोप हेमंत पाटील यांच्यावर केला जात आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार आमदार हेमंत पाटील यांच्या गोंधळामुळे सीएसटी स्टेशनवरुन 9 वाजून 10 मिनिटांनी सुटणारी देवगिरी एक्स्प्रेस तब्बल एक तास उशिरा 10वाजून 6 मिनिटांनी सुटली. रेल्वे एक तास उशिरा सुटल्याने उर्वरित प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.
बुधवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने अधिवेशन संपताच मुंबईबाहेरील आमदारांनी आपल्या घरचा रस्ता धरला. हेमंत पाटील सिकंदराबाद-देवगिरी एक्सप्रेसमधून आपल्या गावी जायला निघाले होते. त्यांच्यासोबत जवळपास 40 आमदारदेखील होते. या आमदारांसाठी रेल्वेने खास बोगीची व्यवस्था केली होती. मात्र मनासारखी जागा मिळाली नाही, म्हणून हेमंत पाटील यांनी तब्बल एक तास गाडी रखडवल्याचा आरोप होत आहे.