दीप्ती देशमुख, मुंबईलांबच्या पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये लुटमार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ऐन वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस नसणे ही तर नित्याची बाब झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. एका महिलेचे दागिने चोरीला गेल्याबद्दल आणि तिला मानसिक त्रास सहन करावा लागल्याबद्दल दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंचाने पश्चिम रेल्वेला ६४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. गुजरातमध्ये वलसाड येथे राहणाऱ्या ऐकल शाह व त्यांचा चार वर्षीय मुलगा राज शहा २०१४ मध्ये वापी पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत असताना दोन गुंडांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे दागिने, पर्स, मोबाईल इत्यादींची चोरी केली.धावत्या ट्रेनमधून उडी मारुन हे दोन्ही चोर फरार झाले. त्यांच्यापाठोपाठ ऐकल यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र प्लॅटफॉर्मवर एकही पोलीस नव्हता. अंधेरी स्टेशनला ट्रेन थांबल्यानंतर बाजूच्या डब्ब्यातील प्रवाशांनी ऐकल यांना मदत केली. प्रवशांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणाऱ्या रेल्वेला ऐकल यांनी ग्राहक मंचात खेचले. आरक्षित डब्ब्यात कोणीही चढू नये, याची खबरदारी घेण्याचे काम टीसीचे असतानाही त्या दिवशी संबंधित डब्यात टीसी नव्हता. त्याशिवाय प्लॅटफॉर्मवर एकही पोलीस नव्हता. रेल्वेने कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई, चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत आणि या प्रसंगामुळे मुलाच्या मनावर परिणाम झाला म्हणून त्याला डॉक्टरांकडून उपाय करण्यासाठी आलेला खर्च इत्यादी मिळून पश्चिम रेल्वेने १७ लाख ९० हजार ३७३ रुपये द्यावेत, असेही ऐकल यांनी याचिकेत नमूद केले आहे.मात्र पश्चिम रेल्वेने ऐकल यांची मागणी साफ फेटाळली. ‘रेल्वे लवादाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. ग्राहक मंचाच्या अखत्यारित ही केस येत नाही. तसेच ऐकल यांचे सामान बुक केलेले नव्हते. बुकिंग केलेले सामान चोरीला किंवा गहाळ झाल्यास रेल्वे त्याची जबाबदारी घेते. त्यामुळे ऐकल यांना त्यांचे दागिने, पर्स आणि मोबाईल चोरीगेल्याबद्दल नुकसान भरपाई दिली जाऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद रेल्वेच्या वकिलांनी ग्राहक मंचाकडे केला. मात्र ग्राहक मंचाने त्यांचा युक्तिवाद फेटाळत रेल्वेने कर्तव्यात कसूर केल्याचे म्हटले.
रेल्वेला द्यावी लागणार नुकसानभरपाई!
By admin | Published: February 06, 2016 3:36 AM