ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाण्यासह नवी मुंबईतील देखील बहुतांश परिसरांत पावसाच्या हजेरीमुळे काहीवेळ आल्हाददायक वातावरण निर्माण झाले.
मुंबईतील पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, मुलुंडसह भांडुप येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येथे पावसाने विजांच्या कडकडासह हजेरी लावली. अंधेरी, वडाळा, दादर आणि अॅन्टॉप हिल येथेही पावसाच्या आगमनाने वातावरण थोडे सुखावले. घाटकोपर परिसरात तब्बल पंधरा मिनिटे झालेल्या पावसावेळी तांत्रिक खोळंब्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ रखडली होती.
थोड्याच वेळात ती पूर्ववतही झाली. घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप येथे पडलेल्या हलक्या पावसांच्या सरींमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहितीही स्थानिकांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळीच मुंबईवर आभाळ दाटून आले होते. गडद दाटून आलेल्या ढगांनंतर सुरु झालेल्या वीजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरात लावलेल्या पावसाच्या हजेरीमुळे यंदा पाऊस लवकर येणार का? असा कयासही मुंबईकर लावत होते. तथापि, या अवकाळी पडलेल्या तुरळक पावसामुळे पुढचे काही दिवस उकाड्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
लोणावळा परिसरात पावसाची हजेरी
लोणावळा परिसरात आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सायंकाळ पासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होऊन गार हवा सुटली होती. तसेच आकाशात ढगांचा गडगडाट व विजेचा लखलखाट सुरु झाला होता. मागील काही दिवसांपासून लोणावळा परिरात गरमी वाढली होती. दुपारच्या सत्रात 36 ते 39 दरम्यान तापमान जाऊ लागल्याने नागरिक हैराण झाले होते. आज दिवसभर प्रचंड गरमी वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. यातच सायंकाळच्या वेळेत मावळात दाखल झालेला पाऊस लोणावळ्यात कधी येणार अशी चर्चा रंगली असताना रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावत नागरिकांना सुखद दिलासा दिला. लहान मुलांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे वाटसरुची मात्र तारांबळ उडाली, जागा मिळेल त्या ठिकाणी आडोसा पाहून दुचाकी चालक व वाटसरु उभे होते. पावसाला सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल झाल्याने नागरिकांना काही काळ अंधारात रहावे लागले.