पुणे : परतीच्या पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले असून येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे.त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी आणखी ठळक झाले आहे.त्यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात अकोले, कोपरगाव, पाथर्डी, पुणे, येवला ६० मिमी, जामखेड, ओझर ५०, शिरपूर ४०, चाळीसगाव, चांदवड, इगतपुरी, खेड राजगुरुनगर, माळशिरस, निफाड, पुरंदर, शेवगाव येथे ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. मराठवाड्यातील भीम, वैजापूर, औरंगाबाद, बदनापूर, जाफराबाद, कैज, पाटोदा, शिरुर कासार येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता ओमानच्या दिशेने सरकले असून त्याचा धोका टळला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल़ २१ व २२ ऑक्टोबर रोजी त्यात थोडी वाढ होण्याची शक्यता असून २३ व २४ ऑक्टोबरला मॉन्सून राज्यातून परतीच्या वाटेवर असेल.२५ ऑक्टोबरपासून राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होऊन मॉन्सूनची दक्षिणेच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.
* सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात २० ते २२ ऑक्टोबर या तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.* २० ऑक्टोबर रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.* २१ ते २३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. * नांदेड, लातूर जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अन्य जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.